कृषीपंप वीजजोडणी व बिल माफीवर बुधवारी मुंबईत ऊर्जा मंत्र्याची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:20 IST2021-01-17T04:20:51+5:302021-01-17T04:20:51+5:30
कोल्हापूर : कृषीपंपाची प्रलंबित वीजजोडणी, ५० टक्के वीजबिल माफीसह महापूर काळातील नुकसानाबाबत चर्चा करण्यासाठी बुधवारी (दि. २०) ऊर्जामंत्री नितीन ...

कृषीपंप वीजजोडणी व बिल माफीवर बुधवारी मुंबईत ऊर्जा मंत्र्याची बैठक
कोल्हापूर : कृषीपंपाची प्रलंबित वीजजोडणी, ५० टक्के वीजबिल माफीसह महापूर काळातील नुकसानाबाबत चर्चा करण्यासाठी बुधवारी (दि. २०) ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मुंबईत बैठक बोलावली आहे. इरिगेशन फेडरेशनने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर ही बैठक होत आहे. या बैठकीसाठी कोल्हापुरातून माजी खासदार राजू शेट्टी, प्रताप होगाडे, विक्रांत पाटील-किणीकर, बाबासाहेब पाटील-भूयेकर, साताऱ्यातून आर. जी. तांबे, सांगलीतून जे. पी. लाड, पुण्याचे एम. जी. शेलार, जावेद मोमीन यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
विजेच्या संदर्भातील प्रलंबित प्रश्नांसाठी इरिगेशन फेडरेशनतर्फे प्रताप होगाडे यांनी मंगळवारी (दि. १२) ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे बैठक घेण्याबाबत पत्रव्यवहार केला होता. त्याची तातडीने दखल घेत ही बैठक घेत असल्याचा निरोप पाठवून बैठकीला येणाऱ्यांची नावेही निश्चित करुन दिली आहेत. त्यानुसार आता दिनांक २० जानेवारी रोजी ही बैठक होत आहे. या बैठकीत राज्य सरकारने नुकत्याच घेतलेल्या ३० मीटरच्या अंतरातील कृषीपंपाच्या अनधिकृत जोडण्यांना अधिकृतपणे जोडण्या देण्याच्या निर्णयाचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच लॉकडाऊन काळातील सहा महिन्यांच्या वीजबिल माफीसंदर्भात गेल्या सहा महिन्यांपासून सुरु असलेल्या आंदोलनासंदर्भात निर्णय घेण्यासाठी पुढील बैठकीचे नियोजनही ठरणार आहे.