टोलबाबत अधिवेशन संपण्यापूर्वी बैठक

By Admin | Updated: December 11, 2014 00:33 IST2014-12-11T00:10:28+5:302014-12-11T00:33:54+5:30

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : कोल्हापूरच्या आमदारांनी घेतली भेट

Meeting before the end of the session on toll | टोलबाबत अधिवेशन संपण्यापूर्वी बैठक

टोलबाबत अधिवेशन संपण्यापूर्वी बैठक

कोल्हापूर : कोल्हापूर शहरांतर्गत टोलबाबत हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी बैठकीचे आयोजन केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळात आमदार सुरेश हाळवणकर, सत्यजित पाटील, उल्हास पाटील, अमल महाडिक यांचा समावेश होता.
‘आयआरबी’ने कोल्हापूर शहरातील ४९.४९ किलोमीटर लांबीचे रस्ते विकसित करणे आवश्यक होते; पण या रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. युटीलिटी शिफ्टिंगची कामे अद्यापही अपूर्ण असताना कंपनी अन्यायकारक टोलवसुली करत आहे. शासकीय कार्यालय व करवीर तालुक्यातील सर्वच शासकीय कार्यालये शहरात असल्याने ग्रामीण भागातील जनता दररोज खासगी वाहनातून येत असते. त्याचबरोबर गूळ व भाजीपाल्याच्या विक्रीसाठी हजारो शेतकरी कोल्हापूर शहरात येतात.
या टोलचा भुर्दंड जिल्ह्याच्या ग्रामीण जनतेला बसत आहे. गेली चार वर्षे कोल्हापूरची जनता सनदशीर मार्गाने न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करीत आहे. ‘आयआरबी’च्या कर्मचाऱ्यांकडून टोलवसुलीसाठी नेहमीच वाहनधारकांना अरेरावी, शिवीगाळ व मारहाण केली जाते. महिलांनाही शिवीगाळ व धक्काबुक्की झाली आहे.
यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या रस्त्यांचे फेरमूल्यांकन करून युती सरकारच्या माध्यमातून टोलवसुली बंद करण्यासाठी शासनाकडून अनुदान मंजूर करावे, अशी मागणी या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली. यावर सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील व जिल्ह्यातील सर्व आमदारांसोबत अधिवेशन संपण्यापूर्वी बैठक आयोजित करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Meeting before the end of the session on toll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.