टोलबाबत आज मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक
By Admin | Updated: December 24, 2014 00:17 IST2014-12-24T00:07:01+5:302014-12-24T00:17:08+5:30
चंद्रदीप नरकेंचा पुढाकार : जिल्ह्याचे लागून राहिले लक्ष

टोलबाबत आज मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील टोलबाबत उद्या, बुधवारी दुपारी साडेतीन वाजता नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत मुख्यमंत्री दालनात बैठक आयोजित केली आहे. गेले दोन दिवस आमदार चंद्रदीप नरके यांनी बैठकीसाठी प्रयत्न सुरू केले होते.
भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर टोल हद्दपार करण्याची गर्जना सर्वच भाजप नेत्यांनी केली होती. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात येऊन शहरातील टोल रद्द करण्याचे अभिवचन कोल्हापूरकरांना दिले होते; पण सरकार सत्तेवर येऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी कोल्हापूरच्या टोलबाबत कोणताच निर्णय झालेला नाही. ‘आयआरबी’ने केलेली टोलवसुली रद्द करावी, यासाठी १० डिसेंबरला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली आमदारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले होते. टोलबाबत कोल्हापूरच्या जनतेत कमालीचा संताप असून, टोलवसुली कर्मचाऱ्यांच्या दमदाटीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोल्हापूरची टोलवसुली रद्द करून शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी आमदार नरके यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती. अखेर आज, मंगळवारी बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवला असून, उद्या दुपारी साडेतीन वाजता नागपूर येथे ही बैठक होत आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री (उपक्रम) एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, कोल्हापुरातील आमदार राजेश क्षीरसागर, डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, प्रकाश आबीटकर, सत्यजित पाटील, सुरेश हाळवणकर, रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी, कोल्हापूर महापालिकेचे अधिकारी यांच्या उपस्थित बैठक आयोजित केल्याची माहिती आमदार नरके यांनी दिली. (प्रतिनिधी)