गदारोळातच उरकली ‘भोगावती’ची सभा

By Admin | Updated: September 3, 2014 00:30 IST2014-09-03T00:30:21+5:302014-09-03T00:30:21+5:30

शिक्षण मंडळाच्या विषयावर सात तास चर्चा : उर्वरित १२ विषय पाच मिनिटात मंजूर

The meeting of 'Bhogavati' was over in Gadhora | गदारोळातच उरकली ‘भोगावती’ची सभा

गदारोळातच उरकली ‘भोगावती’ची सभा

भोगावती : परस्परविरोधी शेरेबाजी, कार्यकर्त्यांनी एकमेकांना वापरलेली शिवराळ भाषा यांतून झालेल्या गदारोळात विषयपत्रिकेवरील सर्व विषयांचे वाचन करून ते मंजूर करण्यात आले. शिक्षण मंडळाच्या विषयावर सात तास सभा चालली. मात्र, विषयपत्रिकेवरील १२ विषय अवघ्या पाच मिनिटांत मंजूर करण्यात आले. कॉँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी निषेध करीत सर्व विषयांना विरोध दर्शविला.
परिते (ता. करवीर) येथील भोगावती साखर कारखान्याची ५८वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष धैर्यशील पाटील-कौलवकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
दुपारी एक वाजता सभेस प्रारंभ झाला. विषयपत्रिकेवरील पहिला विषय मागील सभेचा इतिवृत्तांत वाचून कायम करणे, यावर चर्चा झाली. शिक्षण मंडळावरील चर्चेत, कारखान्याच्या सत्ताधारी गटाने कॉँग्रेसची सत्ता असलेल्या भोगावती शिक्षण मंडळाच्या संचालकांनी राजीनामा द्यावा, ही मागणी केली. त्यावर कॉँग्रेसने विरोध करीत पुढील विषयावर चर्चा करण्याची मागणी केली. मात्र, एकाच विषयावर सभा सात तास चालली. संघटनेचे कार्यकर्ते मागील हंगामातील १५० रुपये जाहीर करावेत, ही मागणी करीत होते. मात्र, शिक्षण मंडळ या एकाच विषयावर चर्चा होत राहिली. शिक्षण मंडळाबाबत प्रिन्सिपल सेक्रेटरी एस. एस. पाटील यांच्याकडे खुलासा मागितला. त्यांनी खुलासा करीत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे सभेत एकच गोंधळ उडाला. त्यावर पाटील यांनी माफी मागितली आणि सभेला पुन्हा सुरुवात झाली. दरम्यान, सदाशिवराव चरापले हे बोलत असताना सभासदांतून पुन्हा शेरेबाजी झाली. यावरून दोन्ही गटांत गदारोळ सुरू झाला. या गदारोळात विषयपत्रिकेवरील सर्व विषयांचे वाचन केले व सर्व विषय ‘मंजूर-मंजूर’च्या घोषणेत मंजूर करण्यात आले.
सभा संपल्यानंतर कॉँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सर्व विषयांना आपला विरोध असल्याचे सांगितले. चर्चेत उदयसिंह पाटील-कौलवकर, बाबासो देवकर, केरबा पाटील, श्रीपती पाटील, बबन पाटील, हंबीरराव पाटील, एस. डी. पाटील, संजयसिंह पाटील, सदाशिवराव चरापले, तानाजी ठोकरे, संभाजीराव पाटील, प्रा. जालंदर पाटील, जनार्दन पाटील, अण्णाप्पा चौगले, शहाजी पाटील, अशोकराव पवार-पाटील यांनी सहभाग घेतला. (वार्ताहर)
संचालक मंडळाचा निषेध
१२० कोटी रुपये खर्चून को-जन प्रकल्प घेतला जाणार आहे. यावर चर्चा व्हायला पाहिजे होती. कार्यक्रमात सहा लाख टन ऊस उत्पादन नसताना हा प्रकल्प तोट्याचा आहे; म्हणून आमचा याला विरोध आहे. कारखान्याच्या अध्यक्षांनी उत्तरे देण्याऐवजी संचालक उत्तरे देतात, ही प्रथा चुकीची आहे. या सभेत मंजूर केलेल्या सर्व विषयांना आमचा विरोध आहे. कारखान्यातील भ्रष्टाचार उघड होईल म्हणून सभा गुंडाळली असून, कारखान्याच्या कारभारांची चौकशी केली पाहिजे, अशी आमची मागणी असून सभा पळविल्याबद्दल आम्ही संचालक मंडळाचा निषेध करतो, अशी प्रतिक्रिया ‘गोकुळ’चे संचालक पी. डी. धुंदरे आणि माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले यांनी दिली.
विरोधकांच्या काळातील कारभाराची चौकशी व्हावी
भोगावती कारखान्याचा कारभार आम्ही अत्यंत स्वच्छपणे केला आहे. वार्षिक सभेला प्रत्येकाला मान देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. विरोधकांनी शिक्षण संस्था हडप केली आहे. त्यामुळे ते शिक्षण मंडळाच्या प्रश्नांवर बोलू शकत नाहीत. वीजनिर्मिती प्रकल्पावर गेल्या दोन्ही सभांमध्ये चर्चा झाली आहे. तसेच स्वाभिमानी संघटनेबरोबर तसेच अन्य विरोधकांबरोबर चर्चा करून निर्णय घेणार आहे. कै. दादासाहेब पाटील-कौलवकर यांच्या विचाराला विरोधक तिलांजली देत आहेत. विरोधकांनी केलेल्या सन २००० पासूनच्या कारभाराची चौकशी करावी, अशी आमची मागणी आहे, असे धैर्यशील पाटील-कौलवकर यांनी सांगितले.
 

Web Title: The meeting of 'Bhogavati' was over in Gadhora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.