न्यायालयाच्या सुनावणीनंतर पुन्हा बैठक
By Admin | Updated: August 30, 2015 01:01 IST2015-08-30T01:01:57+5:302015-08-30T01:01:57+5:30
सायझिंग-वार्पिंग कामगार संपप्रकरण : सायझिंग कामगार- यंत्रमागधारक प्रतिनिधींची प्रांताधिकारी कार्यालयात बैठक

न्यायालयाच्या सुनावणीनंतर पुन्हा बैठक
इचलकरंजी : सायझिंग कामगारांच्या संपाची कोंडी फोडण्यासाठी शनिवारी प्रांत कार्यालयात सायझिंग कामगार व यंत्रमागधारक प्रतिनिधींची बैठक झाली. चर्चेअंती सोमवारी होणाऱ्या न्यायलायच्या सुनावणीनंतर संयुक्त बैठक आयोजित करून त्यामध्ये तोडगा काढण्याच्यादृष्टीने प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सुधारित किमान वेतनाच्या अंमलबजावणीसाठी सायझिंग-वार्पिंग कामगारांनी ३९ दिवसांपासून संप सुरू केला आहे. त्यामुळे शहर व परिसरातील संपूर्ण वस्त्रोद्योग व त्याच्याशी निगडीत व्यवसाय ठप्प झाले आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी हा संप मागे घेऊन व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्व घटकांची बैठक घ्यावी, अशी मागणी यंत्रमागधाकर संघटनांच्यावतीने प्रातांधिकारी अश्विनी जिरंगे यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार शनिवारी सकाळी प्रांत कार्यालयात बैठक झाली.
प्रारंभी कामगार नेते पाटील यांनी गेल्या २९ वर्षांपासून सायझिंग कामगारांवर अन्याय झाल्याचे सांगत सविस्तर मांडणी केली. सागर चाळके यांनी, कामगारांना चांगले वेतन मिळाले पाहिजे हे आम्हालाही मान्य आहे. मात्र, त्यासाठी संपूर्ण गावाला वेठीस धरणे योग्य नाही, असे सांगितले. कामगार व मालक गुण्या-गोविंदाने नांदत असताना तिसऱ्या माणसाची गरज काय, असा सवाल विनय महाजन यांनी उपस्थित केला. तर मालेगाव, भिवंडी या मोठ्या सेक्टरमध्ये आंदोलन केले जात नाही. मात्र, या ठिकाणी कायदा आणि व्यवहाराची सांगड घालून व्यवसाय होत असतानाही आंदोलन कशासाठी, असा सवाल सचिन हुक्किरे यांनी केला.
कॉ. आनंदराव चव्हाण यांनी, वाढत्या महागाईमुळे कामगार मेटाकुटीला आला आहे. या स्थितीत कामगारांना मिळमारे वेतन हे तुटपुंजे ठरत आहे. त्यामुळे कायदा काहीही असो आम्ही तडजोड करायला
तयार आहोत. त्यासाठी सायझिंगधारकांची समोरासमोर चर्चा होणे गरजेचे असल्याचे
सांगितले. सुमारे दीडतास सुरू असलेल्या या चर्चेत काहीवेळा शाब्दिक चकमकीही उडाल्या. अखेरीस सोमवारी उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीनंतर सायझिंगधारक, कामगार व यंत्रमागधारक प्रतिनिधींची
बैठक घेऊन संपाबाबत समन्वयक तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी कामगार नेत ए. बी. पाटील, आनंदराव चव्हाण, सुभाष निकम, यंत्रमागधारक संघटनांचे सतीश कोष्टी, विनय महाजन, सागर चाळके, सचिन हुक्किरे, विश्वनाथ मेटे, नारायण दुरुगडे, राजगोंडा पाटील, पोलीस उपअधीक्षक विनायक नरळे, पोलीस निरीक्षक संजय साळुंखे, शिवाजी कणसे, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)