परिवहन आयुक्तांना भेटणार
By Admin | Updated: January 19, 2015 00:28 IST2015-01-19T00:08:52+5:302015-01-19T00:28:28+5:30
एजंटांचा पवित्रा : आरटीओ कार्यालयातील कारभार

परिवहन आयुक्तांना भेटणार
कोल्हापूर : राज्याचे परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी राज्यातील सर्व आरटीओ कार्यालये दलालमुक्त करण्याचा आदेश नुकताच दिला. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सर्व एजंटांनी एकत्रित येत या निर्णयाचा फेरविचार करावा, यासाठी खुद्द त्यांनाच भेटून हा निर्णय मागे घेण्याची गळ घालण्याचा निर्णय घेतला. परिवहन आयुक्तांच्या निर्णयामुळे हवालदिल झालेल्या कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाबाहेरील एजंटांनी एकत्रित येत, आयुक्तांनाच मुंबई येथे भेटून हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली जाणार असल्याचे सांगितले. याबाबत राज्यातील सर्व एजंट एकत्रित येऊन लवकरच ही भेट घेतली जाणार आहे. या व्यवसायावर कोल्हापुरातील पाचशे कुटुंबांचे संसार चालतात. शासनाने हा व्यवसाय जर बंद केला तर अनेक कुटुंबे रस्त्यावर येतील. उपासमार होईल. त्यामुळे त्यांना भेटून या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विनंती केली जाणार असल्याचे यावेळी ठरविण्यात आले.
(प्रतिनिधी)