वैद्यकीय अधीक्षकाला लाच घेताना पकडले
By Admin | Updated: August 7, 2014 00:09 IST2014-08-07T00:09:42+5:302014-08-07T00:09:42+5:30
आरोग्य विभागात खळबळ

वैद्यकीय अधीक्षकाला लाच घेताना पकडले
आजरा : आजरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एम. पी. जमादार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी साडेतीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, आजरा ग्रामीण रुग्णालयातील विद्युत उपकरणे व खिडक्यांच्या दुरुस्तीचे काम जून महिन्यात जानबा भीमा तेजम (रा. मसोली, ता. आजरा) यांनी पूर्ण केले. कामाच्या बिलासाठी वारंवार ते फेऱ्या मारत होते. डॉ. जमादार यांनी बिले अदा करण्यास टाळाटाळ करून बिलांच्या मंजुरीसाठी पैशाची मागणी केली. याबाबत संदीप तेजम यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उदय आफळे यांनी पोलीस कॉन्स्टेबल मनोहर खणगावकर, अमर भोसले, दयानंद कडूकर, उल्हास हिरवे यांच्या साहाय्याने आज, बुधवारी दुपारी साडेबारा वाजता सापळा रचून डॉ. जमादार यांना लाच घेताना रंगेहात पकडले. त्यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)