मदरशामधील मुलांची वैद्यकीय तपासणी होणार
By Admin | Updated: January 21, 2017 00:16 IST2017-01-21T00:16:50+5:302017-01-21T00:16:50+5:30
‘लोकमत’चा प्रभाव : पावनगड येथे गटशिक्षण अधिकाऱ्यांची पाहणी

मदरशामधील मुलांची वैद्यकीय तपासणी होणार
पन्हाळा : पन्हाळ्यातील पावनगडावरच्या मदरशामधील त्या २१ मुलांपैकी एक मुलगा जादा आजारी पडल्याने त्याला घरी पाठविण्यात आले असून, ‘लोकमत’च्या बातमीमुळे गटशिक्षण अधिकारी सुनीता कासोटे यांनी भेट देऊन सर्व मुलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना चांगल्या मदरशामध्ये हलविणार असल्याचे सांगितले.
गटशिक्षण अधिकारी सुनीता कासोटे यांनी मदरशामधील मुलांशी हितगूज साधले असता दिवसातून एकवेळ या सर्व मुलांना डाळभात देत असल्याचे उघड झाले, तर बहुतेक मुलांना अस्वच्छतेने खरूज झाली असल्याचे दिसून आले. बहुतेक मुलांना पुरेसे पांघरूण उपलब्ध नाही, तर बातमीच्या प्रभावामुळे येथील शिक्षक हजर नव्हते. गेल्या पंधरा दिवसांपासून या ठिकाणी स्वयंपाकाचे सिलिंडर संपले असून, जेवणासाठी लागणारा डाळभात ही मुलेच तयार करीत आहेत. शौचालयाजवळ चूल मांडली आहे व या ठिकाणी अन्न शिजविले जाते. या सर्वच गोष्टींचा विचार करता या सर्व मुलांची सोमवारी वैद्यकीय तपासणी करून या सर्व मुलांना चांगल्या मदरशामध्ये सोडले जाईल, असे गटशिक्षण अधिकारी यांनी सांगितले.
दरम्यान, या मदरशामध्ये जमा होणारी रक्कम व वस्तू यांचीही तपासणी होणार असून, त्याची सर्व कागदपत्रे घेऊन मदरशाच्या प्रमुखांना सकाळी बोलावले आहे. (प्रतिनिधी)