चौथा स्तंभ असल्याचा प्रसारमाध्यमांना विसर

By Admin | Updated: December 10, 2014 23:47 IST2014-12-10T23:27:55+5:302014-12-10T23:47:09+5:30

जयदेव डोळे : सत्तेच्या बाहेर राहून माध्यमांनी काम केल्यास देश बळकट--अवि पानसरे व्याख्यानमाला

The media has forgotten the fourth column | चौथा स्तंभ असल्याचा प्रसारमाध्यमांना विसर

चौथा स्तंभ असल्याचा प्रसारमाध्यमांना विसर

कोल्हापूर : वाढत्या शहरीकरणामुळे परावलंबित्व वाढत असताना प्रसारमाध्यमे मात्र लोकशाहीतील चौथा स्तंभ असल्याचे विसरून सरकारमधील हिस्सा असल्यासारखी वागत आहेत. सत्तेच्या बाहेर राहून घटनेने दिलेल्या अधिकारात माध्यमांनी वाटचाल केली तरच अर्धपोटी, अर्धशिक्षित व अंधश्रद्धेच्या गर्तेत सापडलेला देश त्यावर मात करून बळकटपणे उभा राहू शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, विश्लेषक जयदेव डोळे यांनी आज, बुधवारी येथे बोलताना केले.
येथील श्रमिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अवि पानसरे व्याख्यानमालेत ‘प्रसारमाध्यमे आणि लोकशाही’ या विषयावर जयदेव डोळे बोलत होेते. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य डॉ. विलास पोवार होते.
आपल्या सुमारे एक तासाच्या व्याख्यानात डोळे यांनी प्रसारमाध्यमांची आजची वाटचाल कशा पद्धतीने सुरू आहे, ही माध्यमं राजकारणी, उद्योगपती, भांडवलदारांच्या मालकीची कशी होत आहेत, यावरच प्रामुख्याने प्रकाशझोत टाकला. जर प्रसारमाध्यमांचे मालकच सत्तेतील हिस्सा असल्यासारखे वागायला लागले तर उपेक्षितांना न्याय कोणी मिळवून द्यायचा? या प्रश्नावर त्यांनी बोट ठेवले.
राजकारणात विरोधी पक्ष नसतो तेव्हा प्रसारमाध्यमांनी विरोधी पक्षाची भूमिका बजावायची असते; परंतु दुर्दैवाने ही जबाबदारी प्रसारमाध्यमांवर पडलेली आहे हे माहीत नसल्यासारखी स्थिती सध्या महाराष्ट्रात आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. ज्यांनी दखल घ्यायला पाहिजे त्या वर्तमानपत्रांनी ‘रोजचंच मढं’ समजून त्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली आहे. माध्यमांची जबाबदारी असताना या प्रश्नाची मांडणी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती तशी झाली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
बातमी साधी सरळ, सोपी असत नाही, असा समज झालेली माध्यमं आता चटपटीत, फोडणी दिलेल्या बातम्या देण्याच्या मागे लागली आहेत. वाचकांना वैचारिक, तात्त्विक, बौद्धिक नको आहे, असा स्वत:चा ग्रह करून घेतल्याने वैचारिक घसरण होत आहे. त्यातच उद्योगपती, राजकारण्यांच्या हातात गेलेली माध्यमं आपण सत्तेतील हिस्सा असून आपणच सत्तेचे सूत्रसंचालन करीत आहोत अशा भ्रमात असल्याने माध्यमांचे अध:पतनही मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहे, असे डोळे म्हणाले. आपल्या ताकदीचा गैरसमज करून घेतल्याने सरकार यंत्रणेला धाक दाखविण्याचे काम माध्यमे विसरली आहेत. आपण सत्तेतील नाही आहोत, असे समजून लिखाण केले तरच समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम या चौथ्या स्तंभाकडून होऊ शकेल. सागर कश्यप यांनी स्वागत केले, तर मोनिका क्षीरसागर यांनी आभार मानले.

Web Title: The media has forgotten the fourth column

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.