मते विकत घेण्यास यंत्रणा झाली सक्रिय
By Admin | Updated: October 11, 2014 00:26 IST2014-10-11T00:23:37+5:302014-10-11T00:26:07+5:30
विधानसभा : दिवाळीपूर्वीच पैशांचा पाऊस

मते विकत घेण्यास यंत्रणा झाली सक्रिय
कोल्हापूर : मतदानासाठी आता अखेरचे फक्त चारच दिवस राहिले असल्याने विखारी प्रचारासह थेट मतेच विकत घेण्यासाठी मातब्बर उमेदवारांची यंत्रणा कामास लागली आहे. आचारसंहिता, पोलिसांच्या तपासण्या आणि विरोधी उमेदवाराचा पहारा असूनही या निवडणुकीत बहुतांश मतदारसंघांत दिवाळीपूर्वीच पैशांचा पाऊस पडणार, हे स्पष्टपणे दिसत आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी येत्या बुधवारी (दि. १५) मतदान होत आहे. त्यामुळे सोमवारी सायंकाळी पाच वाजता जाहीर प्रचाराची सांगता होणार आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत टोकाच्या विखारी प्रचारावरच भर देण्याचे नियोजन बहुतेक उमेदवारांनी केले आहे. त्यासाठी विरोधी उमेदवाराची कुंडली शोधून काढण्यासाठी प्रत्येकाने यंत्रणा कामास लावली आहे. आरोप करताना चर्चा होईल एवढेच पाहिले जात आहे. ते आरोप खरे आहेत की खोटे, याची खातरजमा करण्यास कुणाला वेळ नाही. त्याच्या फंदातही कोण पडायला तयार नाही. मतदारसंघ कोणताही असला तरी लढतीत प्रचंड चुरस आहे. त्यामुळे चार-दोन हजार मतांचाच खेळ आहे. कागल, राधानगरीसारख्या काही मतदारसंघांत तर त्याहून कमी विजयी मताधिक्य असू शकेल, अशी स्थिती आहे. त्यामुळे प्रचाराच्या अस्त्राच्या पलीकडे जाऊन थेट पैशांचे अस्त्र बाहेर काढण्याची तयारी उमेदवारांकडून सुरू झाली आहे. आज दुपारीच शहराच्या पूर्वेकडील गावांतील एका गटाचा प्रमुख कार्यकर्ता भेटला होता. त्याला नेत्यांनी बोलावून घेतले होते. गावांत आपल्याला किती मते मिळतील अशी विचारणा या नेत्याने केली. त्या कार्यकत्याने ‘साहेब, आम्ही पन्नास टक्के आहे म्हटल्यावर पन्नासचे साठ टक्के करण्यासाठी मताला किती पैसे द्यायचे तेवढे सांगा व तेवढे पैसे घेऊन जावा,’ असा थेट निरोपच दिला. त्या कार्यकर्त्यालाही काही क्षण काही समजले नाही. हीच स्थिती एक-दोन मतदारसंघांचा अपवाद वगळता सगळ्याच मतदारसंघांत राहील, अशी स्थिती आहे. तशी आर्थिक ताकद असलेले मातब्बर रिंगणात आहेत. पूर्वी झोपडपट्ट्यांमध्येच पैशांचे वाटप होत असे; परंतु आता इतर ठिकाणीच पैशाची मागणी वाढू लागली आहे. (प्रतिनिधी)