कोल्हापूर : पोस्ट कार्यालयात नोकरी करत उरलेल्या वेळात अभ्यास करून मानकात्रेवाडी (ता.पन्हाळा) येथील मयूरी तुकाराम पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेचा गुरुवारी निकाल जाहीर झाला. यात मयूरी यांनी यश मिळविले. मी खासगी कंपनीत काम करत करत अभ्यासाचे वेळापत्रक तयार केले. मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत मन लावून अभ्यास केला त्यामुळेच हे यश मिळवू शकल्याचे त्यांनी सांगितले. गावातील संजयसिंह माध्यमिक विद्यालयात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झाले. पन्हाळा येथील संजीवन नॉलेज सिटीतील छत्रपती शिवाजी महाराज ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी बारावीपर्यंतचे तर कोल्हापुरातील विवेकानंद कॉलेजमध्ये गणित विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी घेतले. वडील तुकाराम पाटील हे शेती करतात तर आई संगीता पाटील प्राथमिक शिक्षक आहे. मला प्रा. जॉर्ज क्रुझ यांचे मार्गदर्शन लाभले असून आई-वडील, बहीण, भाऊ आणि नातेवाईकांचे प्रोत्साहन मिळाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
Kolhapur: नोकरी करत मानकात्रेवाडीच्या मयूरी पाटीलची पीएसआयपदाला गवसणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 12:38 IST