अवमानाने महापौरांचा ‘वचपा’
By Admin | Updated: March 17, 2015 00:08 IST2015-03-16T23:54:56+5:302015-03-17T00:08:58+5:30
महापालिका सभा : लिखित-अलिखित नियम पायदळी : आयुक्तांच्या नावानेच चालविली सभा

अवमानाने महापौरांचा ‘वचपा’
कोल्हापूर : सत्ताधारी नगरसेवकांनी महापौर तृप्ती माळवी यांना सभागृहात येण्यास दहा मिनिटांचा उशीर होताच, कुठं आहेत महापौर... बोलवा त्यांना, अशी चुळबुळ केली. महापौर सभागृहात येताच १५-१६ नगरसेवक वगळता ५५हून अधिक नगरसेवकांनी आसनावर बसून राहणेच पसंत केले. यानंतर सभागृहाचे कामकाज चालविताना, माननीय आयुक्त... हे असे आहे... आयुक्त साहेब... हे झाले पाहिजे... असे आयुक्तांना उद्देशून भाषण केले. अशाप्रकारे महापालिकेत सोमवारी झालेल्या महासभेत लिखित-अलिखित सर्व नियम पायदळी तुडवीत कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौर तृप्ती माळवी यांच्यावरील राग व्यक्त करीत ‘वचपा’ काढला.लाच प्रकरणात अडकलेल्या महापौर तृप्ती माळवी यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा प्रस्ताव सभागृहापुढे ठेवत, त्यांची कोंडी करण्याचा डाव सत्ताधारी आघाडीने आखला होता. सर्व नगरसेवकांना उपस्थित राहण्याचे फर्मानही काढले. त्याप्रमाणे सभेला विक्रमी संख्येने नगरसेवक उपस्थित होते.सकाळी अकरा वाजून वीस मिनिटांनी सभागृह खचाखच भरले. नगरसेवक सभागृहात येऊनही महापौर सभागृहात येईनात. त्यांना येण्यास विलंब होऊ लागल्यानंतर नगरसेवकांनी कुठं आहेत महापौर... बोलवा त्यांना...असे जोरात ओरडत सभागृहात येण्याचे आवाहन केले. दरम्यान, दहा-पंधरा मिनिटांच्या अवधीनंतर साडेअकराच्या सुमारास महापौर सभागृहात आल्या. महापौर सभागृहात आल्यानंतर नगरसेवकांनी उभे राहण्याची प्रथा आहे. ती मोडत महापौर येताच सभागृहातील त्यांचे समर्थक नगरसेवक वगळता उर्वरित सर्व नगरसेवकांनी खुर्चीवर बसूनच राहणे पसंत केले.यानंतर सभेच्या सुरुवातीस माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांना श्रद्धांजली वाहण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. नगरसेवकांनी सभागृहाच्या नियमाप्रमाणे पीठासन अधिकारी असलेल्या महापौरांना उद्देशून बोलण्याचा अलिखित नियम आहे. मात्र, मंडलिक यांच्या आठवणींना नगरसेवक उजाळा देत असताना, सत्ताधारी नगरसेवकांनी महापौरांचा उल्लेख टाळला. आयुक्तांना उद्देशूनच नगरसेवकांनी भाषणे केली. महापौरांकडे पाहणेही नगरसेवकांनी टाळले. महापौरांना मान देण्याच्या वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरेला प्रथमच छेद दिला. (प्रतिनिधी)
तहकूब सभा आता शुक्रवारी
मंडलिकांना आदरांजली : महापौरांचे नगरसेवकपद रद्दचा ठराव बारगळला
कोल्हापूर : माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी काळम्मावाडी धरण, थेट पाईपलाईन योजना, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवत ते सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले, अशा शब्दांत महापालिकेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी मंडलिक यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर महापौरांचे नगरसेवकपद रद्द करा, या मागणीच्या ठरावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी बोलावलेली सभा तहकूब करत पुन्हा शुक्रवारी (दि.२०) घेण्याचे ठरले.
सुरुवातीस उपमहापौर मोहन गोंजारे, गटनेता राजेश लाटकर, सत्यजित कदम, निशिकांत मेथे यांनी सभा तहकूब करण्याची मागणी केली. त्यानुसार लाटकर यांनी पुन्हा शुक्र वारी सभा घ्यावी, ही मागणी ६०हून अधिक नगरसेवकांची सही असलेले पत्र देत आयुक्तांकडे केली. दरम्यान, मंडलिक यांच्या आठवणींमुळे सभागृह गंभीर बनले. लीला धुमाळ यांनी अश्रंूना आवर घालतच भाषण केले.मंडलिकांना श्रद्धांजली वाहताना लाटकर यांनी टोल आंदोलनाला मंडलिक यांनी दिलेली उभारी विसरता येणार नाही, असे स्पष्ट केले. मंडलिक यांच्यासोबत व विरोधातही काम केले,.जनसामान्यांशी कमालीशी नाळ जुळलेल्या मंडलिक यांच्या कार्याची प्रचिती त्यावेळीच आली, असे आदिल फरास यांनी सांगितले. मंडलिक हे ‘नाही रे’ वर्गासाठी आयुष्यभर झटल्याचे आर. डी. पाटील यांनी नमूद केले.
यावेळी प्रा. जयंत पाटील, सत्यजित कदम, भूपाल शेटे, श्रीकांत बनछोडे, आदींची भाषणे झाली. (प्रतिनिधी)
लाचखोरीचा गंभीर आरोप असलेल्या महापौर तृप्ती माळवी यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा ठराव करून तो राज्य सरकारकडे कारवाईकरिता पाठविण्याचा, तसेच महापौरांना महानगरपालिकेने दिलेले वाहन, मोबाईल, कर्मचारी, आदी सुविधा काढून घ्याव्यात, अशी मागणी करण्याचा निर्धार सत्ताधारी सदस्यांनी केला होता. तशी तयारीही त्यांनी केली होती. मात्र, माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या निधनामुळे महासभेचे रूपांतर शोकसभेत झाले. त्यामुळे महापौरांविरोधातील ठरावांवर शुक्रवारच्या सभेत फैसला होणार आहे.
महापौरसमर्थक तहकूब सभा एक महिन्यानंतर घेण्यासाठी आग्रही होते. मात्र, महानगरपालिका प्रांतिक कायदा प्रकरण दोन कलम (म) नुसार बहुसंख्य (५० टक्क्यांपेक्षा अधिक) नगरसेवकांना सभागृहातील मागणीनुसार सभा पुन्हा कधी घ्यावी, हे ठरविण्याचा अधिकार आहे. या नियमावर बोट ठेवत सत्ताधारी आघाडीच्या नगरसेवकांनी महापौरांना शुक्रवारी सभा घेण्याचा निर्णय घेणे भाग पाडले.
मालोजीराजे गटाची रसद महापौरांना !
कोल्हापूर : रमणमळ्यातील जलतरण तलावाचे उद्घाटन माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते सोमवारी झाले. महापौरांच्या उपस्थित होणाऱ्या या कार्यक्रमास कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी फिरकू नये, अशी पडद्यामागे सूत्रे हलवून ‘फिल्डिंग’ लावली होती; तरीही काँग्रेसच्या १२ व राष्ट्रवादी-शिवसेनेच्या दोन अशा एकूण १४ नगरसेवकांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. उद्घाटनानिमित्त मालोजीराजे गटाने केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे मनपातील घडामोडींना वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.
रमणमळा येथील जलतरण तलावाचे २५ लाख रुपये खर्चून सुशोभीकरण करण्यात आले. त्याचे उद्घाटन माजी आमदार मालोजीराजे यांच्या हस्ते थाटात झाले. कार्यक्रमासाठी महापौर तृप्ती माळवी यांना निमंत्रित केल्याने समारंभास कमीत कमी नगरसेवक उपस्थित राहावेत, यासाठी पद्धशीरपणे नियोजन करण्यात आले होते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौरांच्या जाहीर कार्यक्रमांवर बहिष्कार टाकल्यानंतर मालोजीराजे गटाच्या नगरसेवकांनी सर्वांत प्रथम हजेरी लावली होती. या पार्श्वभूमीवर नगरसेवकांना कार्यक्रमाला जाऊ नये, असे खासगीत निरोपही धाडण्यात आले. त्यामुळे महापौरांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमास खुद्द राजेच उपस्थित राहणार असल्याने किती नगरसेवक उपस्थित राहणार, याबाबत उत्सुकता होती.
काँग्रेसच्या तब्बल १२ तर एकूण १४ नगरसेवकांची उपस्थिती
पाठिंबा कोणाला हे सभागृहातच समजेल : मालोजीराजेंचे सूचक वक्तव्य
उपस्थित नगरसेवक
सत्यजित कदम, राजाराम गायकवाड, प्रकाश नाईकनवरे, प्रतिभा नाईकनवरे, कांचन कवाळे, सरस्वती पोवार, माधुरी नकाते, शशिकांत पाटील, किरण शिराळे, जहॉँगीर पंडत, श्रीकांत बनछोडे, राजू घोरपडे, दिगंबर फराकटे, संभाजी जाधव.
कार्यक्रमामागे कोणताही राजकीय हेतू नाही. मात्र, मनपातील घडामोडी पाहता आमच्या गटाची नेमकी भूमिका सभागृहातच दिसेल. आता भाष्य करणे योग्य होणार नाही.
- मालोजीराजे छत्रपती, माजी आमदार
१ राष्ट्रवादीचे गटनेता राजेश लाटकर व स्थायी समिती सभापती आदिल फरास यांनी मागील सभागृह व महापौर कसे होते, माजी महापौर सुनीता राऊत या टोल आंदोलनात चप्पल हातात घेऊनच सहभागी झाल्या होत्या, गेल्या तीन महिन्यांपूर्वी सर्वसामान्य व उत्साहवर्धक असणारे वातावरण आता राहिले नाही, अशा शब्दांत महापौर माळवी यांना टोचणी देण्याचा प्रयत्न केला.
सभागृहातील बहुसंख्य नगरसेवक माळवींना महापौर मानण्यासच तयार नाहीत. त्यामुळे महापौरांना यापुढेही सभागृह किंवा बाहेर नगरसेवकांकडून मान मिळण्याची शक्यता नाही.
- राजेंद्र लाटकर, गटनेता-राष्ट्रवादी