महापौर निवड आज होणार
By Admin | Updated: July 4, 2015 00:50 IST2015-07-04T00:50:55+5:302015-07-04T00:50:55+5:30
उपमहापौरही देणार राजीनामा : डकरेंच्या निवडीवर होणार शिक्कामोर्तब

महापौर निवड आज होणार
कोल्हापूर : काँग्रेसला पाच महिने उशिरा का होईना अखेर महापौरपद मिळाले. शहराच्या ४२ व्या महापौर म्हणून वैशाली डकरे यांच्या निवडीवर आज, शनिवारी होणाऱ्या विशेष सभेत शिक्कामोर्तब होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकरा वाजता ही सभा होत आहे. याच सभेतच काँग्रेसचे उपमहापौर मोहन गोंजारे व प्राथमिक शिक्षण मंडळ सभापती संजय मोहिते राजीनामा देणार आहेत.तृप्ती माळवी यांचा लाचखोर प्रकरणानंतर राजीनामा लांबविल्याने काँग्रेसकडून राष्ट्रवादीकडे खांदेपालट होणारे शिक्षण मंडळ सभापती व उपमहापौरपदही लांबले. आता नवीन महापौरांची निवडीची औपचारिकता बाकी आहे. त्यामुळे उपमहापौर गोंजारे व शिक्षण मंडळ सभापती मोहिते राजीनामा सादर करणार आहेत. उपमहापौर निवडीचा कार्यक्रम महापौर निवडीप्रमाणेच विभागीय आयुक्तांकडून जाहीर होईल.
आज, शनिवारी वैशाली डकरे या नूतन महापौर म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. त्यानंतर लगेच दुपारी चार वाजता नूतन महापौर व माजी मंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत शहराचा ‘स्मार्ट सिटी’मध्ये समावेश व्हावा, या पाठपुराव्यासाठी तयारीच्या अनुषंगाने महापालिकेत बैठकीचे आयोजन केले आहे.
न्यायालय निर्णयाची धास्ती
नगरसेवकपद रद्दच्या शासनाने केलेल्या कारवाईस स्थगिती मिळावी, यासाठी माळवी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. न्यायालयाने सोमवारचा निर्णय महापौर निवडीस बंधनकारक राहील, असे यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे नवीन महापौरांची निवडीनंतर कायदेशीर पेच निर्माण होण्याची धास्ती अनेकांना सतावत आहे.
सभापतिपदी महेश जाधव निश्चित
शिक्षण मंडळ सभापतिपदासाठी राष्ट्रवादीकडे दुसरा उमेदवारच नसल्याने महेश जाधव यांची निवड निश्चित आहे. उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीचे जालंधर पवार, भूपाल शेटे, मधुकर रामाणे, ज्योत्स्ना पवार-मेढे,
आदी इच्छुक आहेत. इच्छुकांनी नेत्यांकडे जोरदार फिल्डिंग
लावली आहे.