महापौर सोमवारी राजीनामा देतील
By Admin | Updated: February 7, 2015 01:04 IST2015-02-07T01:01:59+5:302015-02-07T01:04:29+5:30
हसन मुश्रीफ : काँग्रेस नगरसेवकांना आश्वासन; बदनामीचा डाव असल्याचा आरोप

महापौर सोमवारी राजीनामा देतील
कोल्हापूर : महापौर तृप्ती माळवी ठरल्याप्रमाणे सोमवारी (दि. ९) होणाऱ्या महापालिकेच्या सभेत राजीनामा देतील, काळजी करू नका, असे आश्वासन आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी शासकीय विश्रामगृहावर काँग्रेस नगरसेवकांच्या शिष्टमंडळास दिले. महापौरांच्या लाचलुचपत प्रकरणामागे मोठे कारस्थान असून, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला बदनाम करण्याचे षङ्यंत्र असल्याचे सूचक विधान मुश्रीफ यांनी यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केले. दरम्यान, महापौर माळवी यांनीही शुक्रवारी मुश्रीफ यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली.लाचखोरीच्या संशयात अडकलेल्या महापौर तृप्ती माळवी यांनी गुरुवारी अटक व जामीन मंजूर झाल्यानंतर पदाचा तूर्त राजीनामा देणार नसल्याचे विधान केले. महापौर राजीनामा न देण्यावर ठाम राहिल्यास त्यांना पदावरून कोणीही हटवू शकणार नाही. त्यामुळे महापौरपदाची संधी असलेल्या काँग्रेस नगरसेवकांत मोठी अवस्थता पसरली. महापौरांनी ठरल्याप्रमाणे सोमवारच्या सभेत राजीनामा द्यावा, या मागणीसाठी उपमहापौर मोहन गोंजारे, गटनेता शारंगधर देशमुख, नगरसेवक सचिन चव्हाण, परिवहन सभापती अजित पोवार, प्राथमिक शिक्षण मंडळ सभापती संजय मोहिते, महिला बालकल्याण सभापती लीला धुमाळ आदी पदाधिकाऱ्यांनी हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. महापौर ठरल्याप्रमाणे राजीनामा देतील, अशी शाश्वती मुश्रीफ यांनी दिल्याने काँग्रेस नगरसेवकांचा जीव भांड्यात पडला.
दरम्यान, काँग्रेस पदाधिकारी येण्यापूर्वी महापौर माळवी यांनी मुश्रीफ यांची भेट घेऊन सविस्तर बाजू मांडली. लाचखोरीत गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय माळवी यांनी व्यक्त केला. न्यायालयावर पूर्ण विश्वास असून लवकरच ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ वस्तुस्थिती समोर येईल, असे महापौरांनी सांगितले. मुश्रीफ यांनी काळजी करू नका, पक्ष पूर्णपणे तुमच्या पाठीशी राहिल,असे सांगून या मागील ‘झारीतील शुक्राचार्य’ लवकरच समोर येतील, असे आश्वासन दिले.
शिवसेनेचा सोमवारी मोर्चा
महापौर तृप्ती माळवी यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर ठपका ठेवण्यात आला आहे. ही कोल्हापूरच्या प्रतिमेस काळीमा फासणारी घटना आहे, असे असूनही महापौर माळवी यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. महापौरांनी राजीनामा द्यावा व महापालिका बरखास्त करावी, या मागणीसाठी सोमवारी (दि.९) महापालिकेवर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.
माळवींची ‘लाचलुचपत’मध्ये हजेरी
लाचप्रकरणी अटक करण्यात आलेल्या महापौर तृप्ती माळवी या शनिवार पेठ येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या कार्यालयात हजेरी देण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी हजर राहिल्या. सुमारे अर्धा तास माळवी या कार्यालयात होत्या. शुक्रवार (दि. ३०) जानेवारीला महापौर माळवी यांचा स्वीय साहाय्यक अश्विन गडकरी याला १६ हजार रुपयांची लाचप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणात माळवी यांचा सहभाग असल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्यांना गुरुवारी (दि. ५) अटक केली.
कोण हा गडकरी
महापौरांचा कोणीही अश्विन गडकरी नावाचा स्वीय साहाय्यक नव्हता. ‘कोण हा गडकरी’ उद्या माझे नाव सांगून कोणीही पैसे घेईल. अॅण्टी करप्शनमध्ये काही महापुरुष नाहीत. कोणा एका फाटक्या माणसाने केलेल्या आरोपावरून थेट महापौरांवर कारवाई करणे चुकीचे आहे. राज्यभर राष्ट्रवादीला बदनाम करण्याचे षङ्यंत्र असून महापौरांची बदनामी हा त्याचाच भाग असल्याचा संशय हसन मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला.