महापौर पदाची पत गेली, आता प्रतिष्ठा दावणीला!

By Admin | Updated: February 20, 2015 00:08 IST2015-02-20T00:06:44+5:302015-02-20T00:08:09+5:30

कोल्हापूरची बेअब्रू : पदावर बसविणारे नेतेही तितकेच जबाबदार

Mayor's post has been removed, now prestige is for DAVANI! | महापौर पदाची पत गेली, आता प्रतिष्ठा दावणीला!

महापौर पदाची पत गेली, आता प्रतिष्ठा दावणीला!

कोल्हापूर : राज्यातील महापौरांना प्रशासकीय अधिकार नाकारल्यामुळे आधीच हे पद शोभेचे बाहुले बनले असताना कोल्हापूरच्या राजकारण्यांनी या पदाचे तीन, चार व सहा महिन्यांकरिता तुकडे पाडून महापौरपदाची शान तसेच महत्त्व कमी केले आणि आता तर राजकीय भूमिकेतून असहकार्याची भूमिका घेत या पदाची प्रतिष्ठा कमी करण्याचा खटाटोप चालविला आहे. राजकारण्यांनी आपल्या प्रतिष्ठा सांभाळण्याकरिता घटनात्मक अस्तित्व असलेल्या कोल्हापूरच्या महापौरपदाची संपूर्ण राज्यभरात बेअब्रू करायची की आपलीच चूक झाली, असं मानून किमान या पदाचा मान ठेवायचा याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ कोल्हापूरच्या नगरसेवकांवर येऊन पडली आहे.
महापौर तृप्ती माळवी या खासगी स्वीय साहायकाकरवी सोळा हजारांची लाच घेताना पकडल्या गेल्या. त्यामुळे स्वाभाविक कोल्हापूर महानगरपालिकेची संपूर्ण राज्यात बेअब्रू झाली. एक नैतिकता म्हणून माळवी यांनी तत्काळ राजीनामा देऊन पदावरून पायउतार होणे अपेक्षित होते परंतु; त्यांनी तो न दिल्यामुळे संतप्त झालेल्या नगरसेवकांनी महापौरपदाची उरली-सुरली इज्जतही घालविण्याचा खटाटोप चालविला आहे. त्यातून महापौरपदाची प्रतिष्ठा पूर्ण धुळीस मिळणार असून, भविष्यात या पदावर विराजमान होणाऱ्या व्यक्तीकडेही जनता त्याच नजरेतून पाहणार आहे.
कोणताही राजकीय वारसा, राजकारणातील त्याग, सामाजिक कार्याची जाणीव नसलेली एक व्यक्ती अशा प्रतिष्ठेच्या पदावर बसल्यावर काय होते, याचा अनुभव सध्या कोल्हापूरकर घेत आहेत. राजकारण आणि कार्यकर्ता या संदर्भातील सगळे निकष तपासून जर अशा महत्त्वाच्या पदावर व्यक्तींची निवड केली असती तर आजच्यासारखी गंभीर परिस्थिती निर्माण झाली नसती. त्यामुळे माळवी यांना या पदावर बसविणारेही तितकेच जबाबदार आहेत.
लाच स्वीकारल्यानंतर त्यांनी राजीनामा देण्यास भाग पाडले जाण्याची पद्धत अत्यंत चुकीची दिसत आहे. लाच स्वीकारल्यानंतर माळवी यांनी पदावर राहू नये, ही एक नैतिकता मानली गेली असली तरी त्यांनी राजीनामा दिला नाही म्हणून त्यांची पुन्हा नाचक्की करणे बरोबर नाही, कारण येथे व्यक्ती म्हणून माळवी यांच्याबरोबरच महापौरपदाचीही नाचक्की होत आहे.
सभेच्या कामकाजावर बहिष्कार हे काही असहकार्याचा भाग होत नाही, महापालिकेचे कामकाज असलेल्यांना तरी माहीत असायला हवे होते. जर महापौरांना असकार्यच करायचे असेल तर त्यांनी आणलेली कामे एकमताने नाकारता येऊ शकतात किंवा सभागृहात नामंजूर करता येऊ शकतात. महासभेवर बहिष्कार घातला तर त्याचा एकूण कामकाजावर परिणाम होणार आहे. नवीन अंदाजपत्रक तयार करण्याचा लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवकांचा हक्क व अधिकार आहे. तो या वादात गमावला जाऊ नये. (प्रतिनिधी)


महापौरांची अवहेलना सुरूच; दोनवेळा शिवप्रतिमेचे पूजन
महापौर तृप्ती माळवी यांची अवहेलना करण्याचा प्रकार गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशीही घडला. तथापि, याला न जुमानता महापौर माळवी शिवजयंतीच्या कार्यक्रमात सहभागी होऊन छत्रपतींच्या पुतळ्यास अभिवादन केले. बुधवारी साळोखेनगरात शिबिराच्या उद्घाटनप्रसंगीही असाच प्रकार घडला होता. गुरुवारी सकाळी दहा वाजता महानगरपालिकेत प्रथेप्रमाणे महापौरांनी प्रतिमा पूजन केले. त्यानंतर उपमहापौर मोहन गोंजारे यांनीही स्थायी समिती सभापती आदिल फरास, महिला बालकल्याण समिती सभापती लीला धुमाळ, गटनेता शारंगधर देशमुख, रमेश पोवार, संजय मोहिते, चंद्रकांत घाटगे, आदींना बरोबर घेत शिवप्रतिमा पूजन केले. शिवाजी चौकातील मुख्य कार्यक्रमावेळीही हाच अनुभव आला. जन्मकाळ झाल्यावर महापौरांच्या हस्ते श्रीफळ फोडले जाते; परंतु राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, स्थायी सभापती आदिल फरास यांनी हा मान महापौरांना मिळून न देता आधीच श्रीफळ फोडले.

 

Web Title: Mayor's post has been removed, now prestige is for DAVANI!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.