सभाच तहकूबचा महापौरांचा डाव
By Admin | Updated: March 15, 2015 00:44 IST2015-03-15T00:34:39+5:302015-03-15T00:44:13+5:30
मंडलिक यांच्या निधनाबद्दल दुखवटा व्यक्त करून सभा तहकूब केली जाणार

सभाच तहकूबचा महापौरांचा डाव
कोल्हापूर : उद्या, सोमवारी होणाऱ्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौरांचे अधिकार काढून घ्यावेत, त्यांना पदावरून हटविण्यात यावे, अशी मागणी होणार हे गृहीत धरून ही सभाच तहकूब करण्याची रणनीती महापौर तृप्ती माळवी यांनी आखली आहे. माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या निधनाबद्दल दुखवटा व्यक्त करून सभा तहकूब केली जाणार आहे.
काहीही करून, कोणतेही मुद्दे घेऊन महापौर तृप्ती माळवी यांना त्यांच्या पदावरून पायउतार करण्याचा निर्धार कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी केला आहे. विशेष सभा बोलाविण्यास ठाम नकार देणाऱ्या माळवी यांनी उद्या सर्वसाधारण सभा बोलावून एकप्रकारे दोन्ही कॉँग्रेसच्या नगरसेवकांना शहच दिल्याचे मानले जात आहे. जरी नगरसेवकांनी महापौर माळवी यांच्या विरोधात ठराव करून राज्य सरकारला तो पाठविण्याचे ठरविले असले, तरी उद्याची सभाच मंडलिक यांना श्रद्धांजली वाहून तहकूब करण्याचा डाव माळवी यांनी रचला आहे. सभेच्या कामकाजपत्रिकेवर प्रथम शोक प्रस्ताव घेतले जातात. त्यानंतर पुढील कामकाज सुरू होते. याच संधीचा फायदा त्या घेण्याची शक्यता आहे. शोक प्रस्तावाचे वाचन झाल्यावर लागलीच चर्चा सुरू करून नंतर पुढील कोणतेही कामकाज न घेता महापौर माळवी सभा तहकूब करतील, अशी चर्चा महानगरपालिका वर्तुळात शनिवारी सुरू होती.
उद्याच्या सभेत महापौरांवर नैतिक अध:पतनच्या मुद्द्यावर कारवाई करावी, असा ठराव केला जाणार आहे. शिवाय त्यांना पालिकेने दिलेले वाहन, मोबाईल, कर्मचारी आदी सुविधा काढून घ्याव्यात, अशी मागणीही केली जाणार आहे; परंतु महापौरांनी जर सभा तहकूब केली, तर कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे सगळे प्रयत्न अयशस्वी ठरणार आहेत.
ठराव झाला तरी अंमलबजावणीचं काय?
महापौर माळवी या लाच स्वीकारताना सापडल्या असून, त्यांच्यावर कारवाई झाली आहे; परंतु जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही, तोपर्यंत त्यांना पदावरून हटविता येत नाही. त्यामुळे सोमवारच्या सभेत जरी ठराव झाला, तरी त्या ठरावाची अंमलबजावणी कोण आणि कोणत्या आधारावर करणार हाच प्रश्न आहे.(प्रतिनिधी)