महापौर, उपमहापौर निवड १६ नोव्हेंबरला शक्य
By Admin | Updated: November 4, 2015 00:41 IST2015-11-04T00:38:46+5:302015-11-04T00:41:06+5:30
विभागीय आयुक्तांना पत्र : राजकीय हालचाली गतिमान

महापौर, उपमहापौर निवड १६ नोव्हेंबरला शक्य
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित सभागृहाची पहिली सभा सोमवारी (दि. १६ नोव्हेंबर) होण्याची शक्यता असून, या सभेत महापौर व उपमहापौर यांची निवड केली जाईल. नव्या सभागृहाची सभा घेण्यास अनुमती देण्याची विनंती करणारे पत्र मंगळवारी नगरसचिव तथा सहायक आयुक्त उमेश रणदिवे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविले. त्याला दोन दिवसांत सहमती मिळेल, असे सांगण्यात आले. दरम्यान, रविवारी झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या सर्व सदस्यांची नावे मंगळवारीच राजपत्रात (गॅझेट) प्रसिद्ध करण्यात आली.
विद्यमान सभागृहाची मुदत १४ नोव्हेंबरला संपत असून, नवीन सभागृह १५ नोव्हेंबरला अस्तित्वात येणे आवश्यक आहे, त्यानुसार मनपा प्रशासनाने सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. १६ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता नव्या सभागृहाची बैठक होण्याची शक्यता आहे. पहिल्या सभेत महापौर आणि उपमहापौर यांची निवड केली जाईल.
महापौरपदासाठी यवलुजे यांचे नाव आघाडीवर
महापौरपदासाठी ओबीसी महिला प्रवर्गातील स्वाती यवलुजे, अश्विनी रामाणे, दीपा मगदूम व उमा बनसोडे या चार नगरसेविका कॉँग्रेसमध्ये असून, त्यामध्ये स्वाती यवलुजे यांचे नाव आघाडीवर आहे. स्वाती यवलुजे यांचे पती सागर यवलुजे यांचे सतेज पाटील यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. शिवाय त्या कसबा बावड्याच्या रहिवासी आहेत. त्यामुळे प्राधान्य कसबा बावड्याला द्यायचे झाल्यास स्वाती यवलुजे यांचेच नाव आघाडीवर येते.
पाच स्वीकृत सदस्य
महानगरपालिकेचे नवीन सभागृह अस्तित्वात येताच स्वीकृत सदस्य म्हणून पाचजणांची निवड करण्यात येणार आहे. गतवेळच्या सभागृहातही पाच सदस्य स्वीकृत होते. तीच संख्या यावेळीही कायम ठेवली आहे. राजकीय पक्षांना त्यांच्या सदस्य संख्येनुसार स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती करण्याचा अधिकार मिळणार आहे. कॉँग्रेसचे सर्वाधिक २७ सदस्य असल्याने त्यांचे २, राष्ट्रवादी कॉँग्रेस १, भाजप १ व ताराराणी आघाडी १ असे स्वीकृत सदस्य सभागृहात जातील.
महापौर, उपमहापौरांसाठी सोमवारी अर्ज भरणार ?
१५ नोव्हेंबरला महापालिकेच्या नवनिर्वाचित सभागृहाची पहिली सभा घ्यायची ठरल्यास सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत (दि. ९ नोव्हेंबर) महापौर व उपमहापौरपदांसाठी उमेदवारी अर्ज भरावे लागणार आहेत. कारण दिवाळीनिमित्त महापालिकेला मंगळवार (दि. १०) ते रविवार ( दि. १५ नोव्हेंबर) अशा सलग सुट्ट्या आहेत. त्यामुळे महापौर, उपमहापौरपदांसाठीच्या हालचाली आतापासूनच गतिमान झाल्या आहेत.