खास सभेस महापौरांचा नकार
By Admin | Updated: March 7, 2015 01:05 IST2015-03-07T00:37:52+5:302015-03-07T01:05:24+5:30
राजीनामा प्रकरण : स्थायी सभापतींसह चार सदस्यांची मागणी फेटाळली

खास सभेस महापौरांचा नकार
कोल्हापूर : महानगरपालिकेची विशेष सभा मंगळवारी बोलाविण्यात यावी, अशी मागणी स्थायी समिती सभापतींसह चार सदस्यांनी केली असली तरी महापौर तृप्ती माळवी यांनी त्यास स्पष्ट नकार दर्शविला आहे. सभा बोलाविण्याचे मागणीपत्र शुक्रवारी महापौरांना मिळाले आहे, परंतु सभा घ्यायची नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
महापौर तृप्ती माळवी यांना लाच प्रकरणात अटक झाल्यामुळे यावर चर्चा करून निर्णय घेण्याकरिता ‘विशेष सभा’ घेण्यात यावी, अशी मागणी स्थायी सभापती आदिल फरास, सचिन चव्हाण, शारंगधर देशमुख, ज्योत्स्ना मेढे आदींनी महापौरांकडे गुरुवारी केली आहे. कायद्यातील तरतुदीनुसार अशी मागणी करता येते. त्याचा आधार घेतला गेला आहे, परंतु सभेची तारीख, वेळ व ठिकाण ठरविण्याचे अधिकार महापौरांना आहेत. त्यामुळे त्यांनी मनात आणले तरच अशी सभा घेतली जाऊ शकते. तथापि त्यांनी अशी सभा घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मी माझ्याविरोधात कशी सभा घेण्यास अनुमती देऊ, अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘लोकमत’ला दिली.
महापौरपद अडीच वर्षांसाठी राखीव आहे. त्यामुळे तृप्ती माळवी यांनी मनात आणले, तर १५ आॅक्टोबरपर्यंत या पदावर राहता येणार आहे. अन्य सदस्यांनी त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याची कायद्यात तरतूद नाही. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला असला तरी तो सिद्ध व्हायचा आहे. त्यामुळे जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत सरकारलाही त्यांना पदावरून हटवता येणार नाही.
महापौरांच्या सभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय दोन्ही काँग्रेसच्या नगरसेवकांनी घेतला आहे, परंतु त्यात नुकसान महापौरांपेक्षा नगरसेवकांचेच आहे. त्यातही ‘कारभारी नगरसेवकां’चे नुकसान अधिक आहे. आपणाला हवा तसा ठराव करून घेण्यासाठी महापौरपदावर असलेल्या व्यक्तीचे सहकार्य अपेक्षित असते. त्यांच्या ठरावावर महापौरांची सही होणे आवश्यक असते.
गाडी काढून घेण्याच्या हालचाली
लाच प्रकरणात कारवाई होऊनही महापौर तृप्ती माळवी या राजीनामा देण्यास तयार नसल्याने, त्यांची गाडी व अन्य सुविधा काढून घेण्याच्या हालचाली सत्तारूढ दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांकडून सुरू झाल्या आहेत. विशेष सभा बोलाविण्याची मागणी ही त्याच प्रक्रियेचा भाग असल्याचे मानले जाते. स्थायी समितीच्या चार सदस्यांनी लेखी मागणी केल्यास महापौरांना विशेष सभा बोलवावी लागते; परंतु तूर्त माळवी यांनी अशी सभा बोलाविण्यास नकार दिला आहे. ज्या चार सदस्यांनी ही मागणी केली आहे. एकदा नकार दिल्यावर हेच चार सदस्य पुन्हा सभेची अशीच लेखी मागणी करू शकतात. ती महापौरांनी फेटाळून लावल्यास मुंबई प्रांतिक महापालिका कायद्याच्या सेक्शन १३ (अ) अन्वये महापौरांना अपात्र ठरविता येते. त्यामुळे दुसरे पत्र दिल्यावर महापौरांना सभा बोलाविणे बंधनकारक राहील. ही सभा झाल्यास त्यामध्ये महापौरांचे वाहन व स्वीय साहाय्यकांसह अन्य सुविधा काढून घ्याव्यात, असा ठराव बहुमताने मंजूर करून घेऊन त्या सुविधा काढून घेता येतात. ‘महापौर, कोल्हापूर’ अशी पाटी असलेली गाडी ही त्या पदाचीही प्रतिष्ठा वाढविणारी असते. तीच काढून घेतल्यावर त्यांचा रुबाबही उतरतो, तसेच महापौरांनी सभागृहाचा विश्वास गमावला असल्याने त्यांनी घेतलेल्या कोणत्याही निर्णयाची अंमलबजावणी करू नये, असाही ठराव मंजूर केला जावू शकतो.