माउलींचे पाऊल साताऱ्याच्या अंगणात!

By Admin | Updated: July 16, 2015 23:55 IST2015-07-16T23:55:01+5:302015-07-16T23:55:01+5:30

उत्साहात स्वागत : पादुकांच्या नीरा स्नानानंतर वैष्णवांचा मेळा जिल्ह्यात दाखल

Mauli's foot in the court of Satara! | माउलींचे पाऊल साताऱ्याच्या अंगणात!

माउलींचे पाऊल साताऱ्याच्या अंगणात!

लोणंद/खंडाळा :
पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान,
आणिक दर्शन विठोबाचे,
हेचि घडो मज जन्मजन्मांतरी,
मागणे श्रीहरी नाही दुजे...
ही भावना उराशी बाळगून सावळ्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी निघालेले लाखो वारकरी, नभांगणी फडकणाऱ्या भगव्या पताका, टाळ-मृदंगांचा गगनभेदी निनाद, ज्ञानोबा-तुकारामाचा जयघोष आणि देहभान विसरून नाचणारा वैष्णवांचा मेळा अशा भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे ऐतिहासिक सातारा जिल्ह्यात नीरातिरी गुरुवारी उत्साहात स्वागत झाले.
माउलींच्या सहवासात पंढरीच्या विठुरायाची वारी पूर्ण करण्याची आस मनात बाळगून अवघ्या महाराष्ट्रातून आणि इतर राज्यांतूनही लाखो वारकरी लोणंदनगरीत दाखल झाले. सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील नीरा नदीच्या तीरावर पुणे जिल्ह्यातून पालखीचे दुपारी दोनला आगमन झाले. यावेळी पालखीच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील मान्यवरांसह हजारो भाविक उपस्थित होते. नीरा नदीवरील पुलावर माउलींच्या पालखीचा रथ थांबल्यानंतर प्रथेप्रमाणे माउलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले.
जिल्ह्याच्या सीमेवर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचे ढोल-ताशांच्या गजरात ऐतिहासिक स्वागत करण्यात आले. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, उपाध्यक्ष रवी साळुंखे, आमदार मकरंद पाटील, समाजकल्याण समितीचे माजी सभापती आनंदराव शेळके-पाटील, प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर, सभापती रमेश धायगुडे-पाटील, उपसभापती सारिका माने, पंचायत समिती सदस्य नितीन भरगुडे-पाटील, अनिरुद्ध गाढवे, तहसीलदार शिवाजीराव तळपे, गटविकास अधिकारी विलासराव साबळे, राहुल घाडगे, गुरुदेव बरदाडे, शामराव गाढवे उपस्थित होते. पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सातारचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याकडे पालखीची सूत्रे सुपूर्द केली. (प्रतिनिधी)

नीरा तीर दुमदुमला
आळंदी ते पंढरपूर वारीमध्ये माउलींच्या पादुकांना नीरा नदीपात्रात दत्तघाटावर अभ्यंगस्नान घातले गेले. यावेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. माउलींचा हा सोहळा पाहण्यासाठी हजारो वैष्णवांनी ‘माउली, माउली..’चा जयघोष केला. त्यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते. दुपारी २.२५ वाजता अभ्यंगस्नान झाल्यानंतर पादुका रथामध्ये ठेवण्यात आल्या. दिंडी प्रमुखांच्या आदेशाने पालखी रथ सातारा जिल्ह्याच्या स्वागतकमानीजवळ आला. त्याठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले.

Web Title: Mauli's foot in the court of Satara!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.