पावसासाठी ‘माउलीं’ना साकडं..!
By Admin | Updated: July 19, 2015 00:40 IST2015-07-19T00:38:04+5:302015-07-19T00:40:10+5:30
तू सकल जगाचा त्राता... : लोणंदकरांचा निरोप घेऊन पालखी सोहळा तरडगावकडे मार्गस्थ; आषाढी वारीत दंगले वारकरी

पावसासाठी ‘माउलीं’ना साकडं..!
राहिद सय्यद / लोणंद
मुखदर्शन व्हावे आता।
तू सकल जगाचा त्राता।।
घे कुशीत गा माउली।
तुझ्या पायी ठेवितो माथा।।
टाळ-मृदंगाच्या गजरात, माउली... माउली, माझी विठूमाउली’चा जप करीत लोणंदनगरीतून माउलींचा पालखी सोहळा अडीच दिवसांचा मुक्काम संपवून दुपारी एकच्या सुमारास तरडगावकडे मार्गस्थ झाला. भक्तिरसात दंग झालेल्या भक्तांनी तहानलेल्या शिवाराला ओलंचिंब करण्यासाठी माउलीला चांगला पाऊस पडून दुष्काळ हटविण्याचे साकडे घातले. पावसाने ओढ दिल्याने धास्तावलेल्या भक्तांनी ‘तू सकल जगाचा त्राता’ अशी आर्त साद घातली.
पालखी सोहळ्याच्या लोणंद येथील दोन मुक्कामांनंतर माउलीच्या पालखीने लोणंदनगरीतून दुपारी प्रस्थान केले. त्यापूर्वी माउलींची आरती करण्यात आली. दिंड्यांमध्ये सकाळपासूनच न्याहरीबरोबरच दुपारच्या जेवणाची तयारी सुरू होती.
लोणंद ते तरडगाव रस्त्याने एका बाजूने वाहने तर दुसऱ्या बाजूने वारकरी तरडगावकडे जात होते. पहाटेपासूनच वारीत चालणारे वारकरी दिनचर्या उरकून चांदोबाच्या लिंबाकडे मार्गस्थ होताना दिसत होते. माउली प्रस्थान करणार असल्याने पालखीतळावर सकाळपासूनच भाविकांनी निरोप देण्यासाठी गर्दी केली होती.
फुलांनी सजविलेल्या रथात माउलींची पालखी ठेवण्यात आल्यानंतर पादुकादर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. साडेबाराच्या सुमारास माउलीने तरडगावकडे प्रस्थान केले. रथापुढे २७ दिंड्या होत्या. सनई-चौघड्याच्या मंगलमय सुरात पालखी मार्गस्थ झाली. पुढे चोरपदाराचा अश्व चालला होता तर रथाच्या मागे दिंड्यातील वारकरी चालले होते.
हरिनामाचा गजर करीत वारकरी शिस्तबद्धपणे लोणंदमधून गांधी चौक, शास्त्री चौक, स्टेशन चौक, रेल्वे पूल, पोलीस स्टेशनमार्गे तरडगावकडे मार्गस्थ झाले. भाविक इमारतीच्या छतावर, बाल्कनीत उभे राहून पालखी सोहळ्याचे नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवत होते.
दुपारी तीनच्या सुमारास पालखी सोहळ्याने कापडगाव, ता. फलटण हद्दीत प्रवेश केला. लोणंद पालखीतळावर ग्रामपंचायतीच्या वतीने पालखी सोहळ्याचे डॉ. प्रशांत सुरू, विश्वस्त शिवाजीराव मोहिते, मालक बाळासाहेब पवार, नाना चोपदार, राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार, सेवेकरी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच स्नेहलता शेळके-पाटील, उपसरपंच गनीभाई कच्छी, ग्रामसेवक लालासाहेब निंबाळकर, श्यामसुंदर मुळे, सदस्य, कर्मचारी उपस्थित होते.
माउलींच्या स्वागताला फलटण तालुका सज्ज
खंडाळा तालुक्यातील लोणंदनगरीतील अडीच दिवसांचा मुक्काम संपवून माउलींचा पालखी सोहळा फलटण तालुक्यातील तरडगाव मुक्कामी विसावला आहे. तालुक्यात तरडगाव, फलटण शहर आणि बरड असे तीन मुक्काम असून त्यासाठी प्रशासन, विविध संस्थांनी माउलींच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. नगरपालिकेने विमानतळावरील पालखीतळावर वीज, पिण्याचे पाणी, मोबाईल टॉयलेट, टँकरची व्यवस्था केली आहे. स्वच्छता करण्यासाठी यंत्रणा उभारली आहे. पंचायत समितीच्या वतीने आरोग्य पथक, पाणी टँकर फिडर, पुरेसा औषधसाठा, पाणी शुद्धीकरण यंत्रणा, मोबाईल आरोग्य पथक, रुग्णवाहिका, पुरेसा रॉकेलसाठा, धान्य, गॅस, पोलीस बंदोबस्त आदी सुविधा करण्यात आल्या आहेत.