जिल्हा बँकेसाठी मातब्बरांचे अर्ज दाखल
By Admin | Updated: April 7, 2015 01:22 IST2015-04-07T01:03:21+5:302015-04-07T01:22:02+5:30
इच्छुकांची मांदियाळी : मुश्रीफ, महाडिक, शेट्टी, ‘पी. एन.’, ‘के. पीं.’चे उमेदवारी अर्ज; १०७ जणांचे १५५ अर्ज

जिल्हा बँकेसाठी मातब्बरांचे अर्ज दाखल
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅँक निवडणुकीसाठी (केडीसीसी) सोमवारी १०७ जणांनी १५५ अर्ज दाखल केले.
खासदार राजू शेट्टी, खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, आमदार महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील, आमदार अमल महाडिक, के. पी. पाटील, व्ही. बी. पाटील, संजय मंडलिक, निवेदिता माने, अरुंधती महाडिक, राजलक्ष्मी खानविलकर, आदी प्रमुख नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. पी. एन. पाटील, खासदार शेट्टी यांनी शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केला, तर आमदार मुश्रीफ, खासदार महाडिक, आमदार महाडिक यांनी सूचकांकडून अर्ज दाखल केला. आमदार मुश्रीफ यांनी प्रवीण भोसले, तर आमदार महाडिक यांनी जिल्हा परिषदेचे पक्षप्रतोद शहाजी पाटील यांच्यामार्फत अर्ज दाखल केले. पी. एन. पाटील व त्यांचे सुपुत्र राहुल पाटील यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केला. के. पी. पाटील यांनी स्वत: येऊन अर्ज भरला.
बॅँकेचे माजी अध्यक्ष पी. जी. शिंदे, बाबूराव हजारे, बॅँकेचे माजी व्यवस्थापक असिफ फरास, रणजितसिंह कृष्णराव पाटील, बाळासाहेब सरनाईक, आशिष आनंदराव पाटील, बाबूराव हजारे, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, पुंडलिक रावजी पाटील, वेदांतिका धैर्यशील माने, माधुरी मधुकर जांभळे, आदींनी अर्ज दाखल केले. चंदगड व शाहूवाडी तालुक्यातून संस्था गटातून एकही अर्ज दाखल झाला नाही.
आघाडीचा चर्चेनंतर निर्णय : पी. एन.
अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पी. एन. पाटील म्हणाले, आम्ही सत्तेत असताना कमी व्याजदराने शेतकऱ्यांना कर्जे दिली, अनेक योजना सुरू केल्या, व्यवसाय वाढीसाठी प्रोत्साहन म्हणून कर्मचाऱ्यांचे पगार वाढविले. विकास सेवा संस्थांच्या सचिवांनाही चांगले पगार केले. मागील काळात बॅँकेत कोणी पैसे खाल्ले नाहीत, थकीत रकमेपोटी कारवाई झालेली आहे, ती कारवाईही चुकीची आहे. न्यायदेवतेने आमच्या बाजूने निकाल दिला. १४७ कोटी थकीत नाहीत. ६० कोटी पर्यंत थकबाकी आहे, त्यातील ५० कोटी आम्ही वसूल करून देऊ शकतो. बॅँकेच्या हिताचा निर्णय घेतला जाईल. जिल्ह्णातील कॉँग्रेस नेत्यांशी चर्चा करून राष्ट्रवादीच्या आघाडीबाबत निर्णय घेउ, असेही त्यांनी सांगितले.