प्रसुती सुरक्षेचे आले भान
By Admin | Updated: July 10, 2014 00:54 IST2014-07-10T00:47:58+5:302014-07-10T00:54:17+5:30
माता मृत्यू प्रमाण घटतेय : वर्षभरात ४१ हजार प्रसुतीमध्ये १५ मातांचा मृत्यू

प्रसुती सुरक्षेचे आले भान
राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूर
आरोग्य विभागाने शासकीय योजनांचा प्रचार व प्रसार अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केल्याने कोल्हापूर जिल्ह्यात माता मृत्यूचे प्रमाण घटत चालले आहे. रक्तक्षयामुळे माता मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याने गेली दोन वर्षे जिल्हा आरोग्य विभागाने त्याकडे कटाक्षाने लक्ष केंद्रीत केल्याचे फलित दिसू लागले आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत हे प्रमाण अल्प असून प्रबोधनातून गरोदर मातांमध्ये जागृतीची मोहीम आरोग्य विभागाने हातात घेतली आहे.
एवढ्या अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध असताना राज्यात माता मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे दिसते. ही बाब निश्चितच चिंताजनक असल्याने शासनाने गरोदर मातांसाठी विविध उपक्रम सुरू केले आहेत पण त्याचा प्रसार व प्रचार व्यवस्थित होत नसल्याने अनेक जिल्ह्यांत हे उपक्रम केवळ कागदावरच दिसतात. पण कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गेल्या दोन वर्षांत माता मृत्यू नियंत्रित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.
एकूण माता मृत्यूपैकी २५ टक्के मातांचे मृत्यू हे रक्तक्षयानेच होतात. गरोदर मातेच्या अंगात रक्ताचे प्रमाण कमी असल्याने प्रसुतीवेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन माता दगावण्याची शक्यता अधिक असते. ग्रामीण महिलांमध्ये रक्ताचे प्रमाण फारच कमी आढळते.
यासाठी आरोग्य विभागाने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचे परिणाम सध्या दिसत असून गेल्या वर्षभरात शासकीय दवाखान्यात ४१ हजार १३५ प्रसुती झाल्या, यामध्ये १५ मातांचे मृत्यू झाले आहेत. दोन वर्षांपूर्वी ३९ हजार प्रसुतीमध्ये ३७ मातांचे मृत्यू झाले होते. दोन वर्षांत माता मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे.
काय आहे ‘जननी सुरक्षा’
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य विभागाच्यावतीने जननी सुरक्षा कार्यक्रम राबविला जातो. त्यामध्ये दारिद्र्यरेषेखालील ग्रामीण महिलेची शासकीय दवाखान्यांत प्रसुती झाल्यानंतर त्या मातेला ७०० रुपये तर शहरी मातेला ६०० रुपये अनुदान दिले जाते. घरी प्रसुती झाली तर पाचशे रुपये दिले जातात.
त्याचबरोबर जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमातंर्गत गरोदर मातेला घरापासून दवाखान्यापर्यंत आणले जाते. प्रसुतीनंतर तीन दिवस पोषक आहार मातेला दिला जातो. १०० टक्के मोफत तपासण्या व औषधोपचार केला जातो.