Match of 'Mahasivadhi' in 'ZP'? | ‘झेडपी’त ‘महाशिवआघाडी’ची जुळणी?

‘झेडपी’त ‘महाशिवआघाडी’ची जुळणी?

कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ‘इतर मागास’साठी (ओबीसी) आरक्षित झाल्याने इच्छुकांची संख्या वाढली असून, कोल्हापूर जिल्ह्यातही ‘महाशिवआघाडी’ आकाराला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपला पुन्हा सत्ता राखणे सोपे नाही; तर दुसरीकडे दोन्ही कॉँग्रेससमोर उमेदवारी कुणाला द्यायची, याचा निर्णय घेताना अडचणी आहेत. याआधीचे अध्यक्षपद हे खुले होते.
सत्तारूढ भाजपकडून गटनेते अरुण इंगवले, प्रसाद खोबरे हे इच्छुक असले तरी इंगवले हेच उमेदवार असतील; कारण भाजपमध्ये येतानाच तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांना तसा शब्द दिला होता. विजया पाटील (हातकणंगले), स्मिता शेंडुरे (हातकणंगले) हे भाजपचे सदस्य इतर मागास गटातून निवडून आले आहेत.
दुसरीकडे कॉँग्रेसचे १३ सदस्य असून ते राष्ट्रवादीपेक्षा दोनने जादा आहेत. त्यामुळे कॉँग्रेस अध्यक्षपदावर दावा सांगण्याची शक्यता असून, पांडुरंग भांदिगरे, सविता चौगुले, अरुण सुतार, चंदगड हे तिघेजण इतर मागास आहेत. यामध्ये भांदिगरे यांचे नाव चर्चेत आहे.
राष्ट्रवादीकडे ज्येष्ठ सदस्य जयवंतराव शिंपी (आजरा), युवराज पाटील (कागल), सतीश पाटील (गडहिंग्लज) ही नावे आघाडीवर आहेत. याव्यतिरिक्त विजय बोरगे (शाहूवाडी), परवीन पटेल (शिरोळ), प्रियांका पाटील (पन्हाळा) हे सदस्य इतर मागास गटातून निवडून आले आहेत.
शिवसेनेतून हंबीरराव पाटील (शाहूवाडी), आकांक्षा पाटील (शाहूवाडी), प्रवीण यादव (हातकणंगले), आवाडे यांच्या ताराराणी आघाडीच्या वंदना मगदूम (हातकणंगले), मनीषा माने (हातकणंगले) हेदेखील ‘इतर मागास’मधून निवडून आले आहेत.
विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळविल्यानंतर आता काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून जिल्हा परिषदेमध्ये सत्तांतर घडविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आवाडे यांची ताराराणी आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि चंदगड येथील ‘युवक क्रांती’ या स्थानिक आघाड्यांच्या भूमिकेला पुन्हा एकवार महत्त्व येणार आहे. मात्र, आवाडे यांनी राज्यस्तरावर भाजपला पाठिंबा दिला आहे.
गेल्यावेळी पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल यांना पाठिंबा देण्यासाठी प्रकाश आवाडे यांनी नकार दिल्याने अखेर गणित बिघडले आणि महादेवराव महाडिक यांनी सर्व ताकद पणाला लावत कॉँग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांनाही अनुपस्थित राहायला लावून स्नुषा शौमिका महाडिक यांना अध्यक्ष केले.
भाजप १४, जनसुराज्य सहा, कुपेकर युवक आघाडी चंदगड दोन, आवाडे ताराराणी आघाडी दोन, स्वाभिमानी शेतकरी संघटना दोन, महाडिक यांची ताराराणी आघाडी तीन, शिवसेना सात, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या तिघांची झालेली अप्रत्यक्ष मदत आणि अपक्ष एक अशा एकूण ४० जणांची मोट बांधली गेल्याने भाजपच्या शौमिका महाडिक अध्यक्ष झाल्या.
मात्र, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांनंतर जिल्ह्यातील राजकीय चित्र बदलले आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी उघडपणे लोकसभेला शिवसेनेच्या संजय मंडलिक यांना मदत केली. त्याआधीही मंडलिक आणि आबिटकर यांचे सदस्य हे काँग्रेस, राष्ट्रवादीसोबतच राहिले आहेत. त्यामुळे दोन्ही काँग्रेसचे नेते मंडलिक यांच्या सहकार्याने पुन्हा एकदा जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी उचल खाणार, यात शंका नाही.
सध्या सत्ताधारी भाजपकडे असलेल्यांपैकी चंदगडच्या विद्या पाटील आणि कल्लाप्पाण्णा भोगण यांच्या तालुक्यातून राष्ट्रवादीचे राजेश पाटील निवडून आले आहेत. त्यांनी काँग्रेस आघाडीला पाठिंबा द्यावा, प्रकाश आवाडे आणि राजू शेट्टी यांच्या चार सदस्यांनी आघाडीसोबत यावे यासाठीही आता प्रयत्न होणार आहेत. अध्यक्षपदासाठी ३४ मतांची गरज आहे. सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी, मंडलिक, आबिटकर यांची आघाडी २६ वर
आहे. (सदस्य बंडा माने यांच्या
निधनाने कॉँग्रेसचे एक मत कमी झाले आहे.
ही पोटनिवडणूक १२ डिसेंबर रोजी होणार आहे.) त्यांना आठ मतांची गरज आहे. वरील सहाजण आघाडीकडे गेल्यास राष्ट्रवादीचे नेते व्ही. बी.
पाटील यांच्या अपक्ष स्नुषा रसिका पाटील आघाडीकडे जाणार यात शंका नाही.
काँग्रेसचे सचिन बल्लाळ, रेश्मा देसाई आणि राष्ट्रवादीचे विजय बोरगे या तिघांनी महाडिक यांच्या घरातील उमेदवार म्हणून अनुपस्थित राहून मदत केली होती. या तिघांनाही सदस्यत्व टिकवण्यासाठी व्हिप बजावून दबाव टाकला जाऊ शकतो. यात यश आल्यास काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे संख्याबळ ३९ वर जाऊ शकते. त्यामुळे विधानसभेनंतर आता जिल्हा परिषदेच्या सत्तासंघर्षाला धार येण्याची शक्यता आहे.

Web Title:  Match of 'Mahasivadhi' in 'ZP'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.