कोरे-सरुडकर यांच्यातच रंगणार सामना

By Admin | Updated: June 16, 2014 00:40 IST2014-06-16T00:38:34+5:302014-06-16T00:40:50+5:30

राजू शेट्टी यांची भूमिका निर्णायक : भारत पाटील, अमर पाटील यांची उमेदवारी कोरे यांना अडचणीची

The match between Corey-Sarudkar will be played | कोरे-सरुडकर यांच्यातच रंगणार सामना

कोरे-सरुडकर यांच्यातच रंगणार सामना

राजाराम कांबळे ल्ल मलकापूर
शाहूवाडी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेसाठी डझनभर इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. मात्र, विद्यमान आमदार विनय कोरे व माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांच्यातच मुख्य लढत रंगणार आहे. खासदार राजू शेट्टी यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे, तर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत पाटील व काँग्रेसचे अमर पाटील यांची उमेदवारी विनय कोरे यांची डोकेदुखी वाढविणारी आहे.
‘राष्ट्रवादी’चे कार्याध्यक्ष मानसिंगराव गायकवाड, ‘काँग्रेस’चे कर्णसिंह गायकवाड हे दोन्ही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की, अन्य कोणाला पाठिंबा देणार यावर मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होणार आहे. पुनर्रचनेनंतर शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात शाहूवाडी तालुका आणि पन्हाळ्यातील दहा जिल्हा परिषद गटात मतदारसंघाची बांधणी उमेदवाराला करावी लागते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार राजू शेट्टी यांना १ लाख ६ हजार १९३ मते मिळाली, काँग्रेसचे उमेदवार कल्लाप्पाण्णा आवाडे यांना ६३ हजार २१३ मते मिळाली. राजू शेट्टी यांना ४२ हजार ९८० मतांचे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांचा निवडणुकीत दबदबा राहणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळालेले मताधिक्य विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने फारसे समाधानकारक नाही. मोदी लाटेत शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघातील नेत्यांनी कल्लाप्पाण्णा आवाडे यांना दिलेला पाठिंबा जनतेला मान्य झाला नाही. त्यामुळे मातब्बर दोन्ही गायकवाड गट, सरुडकर गट व जनसुराज्य पक्षाचा धुव्वा उडाला. त्यामुळे आमदार विनय कोरे, माजी आमदार सत्यजित पाटील यांना विधानसभा निवडणूक सोपी नसल्याचा जनतेने इशारा दिला आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत माजी आमदार सत्यजित पाटील व काँग्रेसचे कर्णसिंह गायकवाड गटाची युती झाली. या आघाडीने चार जिल्हा परिषद व सात पंचायत समितीचे उमेदवार निवडून आणले, तर आमदार विनय कोरे व राष्ट्रवादीचे मानसिंगराव गायकवाड यांच्या युतीने पंचायत समितीची एक जागा व मलकापूर नगर परिषदेवर सत्ता स्थापन केली. या साडेचार वर्षांत पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वेगळे चित्र पाहायला मिळेल.
मानसिंगराव गायकवाड यांनी सरुडकर गटाशी साधलेली जवळीक, तर कर्णसिंह गायकवाड गटाचे जनसुराज्यशी वाढलेले संबंध, शिवसेनेत असलेला अंतर्गत कलह, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वाढत असलेले महत्त्व या सर्व बाबींचा विचार करता आगामी विधानसभा निवडणूक रंगतदार होणार आहे. पन्हाळ्यातून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष भारत पाटील आणि अमर पाटील यांनी केलेली विधानसभेची तयारी आमदार विनय कोरे यांना अडचणीची ठरणार आहे. माजी आमदार सत्यजित पाटील यांनी सेनेची उमेदवारी घेणार, अशी केलेली जाहीर भूमिका तर सेनेतील उपजिल्हाप्रमुख जयवंतराव काटकर व निष्ठावंत शिवसैनिकांनी या उमेदवारीला विरोध जाहीर केला आहे. त्यामुळे सत्यजित पाटील यांना देखील ही निवडणूक सोपी नाही.
युवासेना उपाध्यक्ष युवराज काटकर, ‘दलित महासंघा’चे कार्याध्यक्ष रमेश चांदणे ‘भाजप’चे राजू प्रभावळकर, ‘शेतकरी संघटने’चे माजी सरपंच संजय पाटील, जिल्हा परिषद सदस्य योगिराज गायकवाड, कर्णासिंह गायकवाड, मानसिंगराव गायकवाड या उमेदवारांनी आगामी विधानसभेची चाचपणी सुरू आहे.
आज घडीला विधानसभा निवडणुकीचे चित्र अस्पष्ट असले, तरी आमदार विनय कोरे आणि माजी आमदार सत्यजित पाटील अशी लढत होणार आहे. या दोन्ही गटांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

Web Title: The match between Corey-Sarudkar will be played

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.