विमा फसवणुकीचा ‘मास्टर माइंड’ मोरेवाडीचा
By Admin | Updated: June 29, 2015 00:47 IST2015-06-29T00:46:08+5:302015-06-29T00:47:07+5:30
शक्ती माटुंगेसह तिघे फरार : अनेक बड्या धेंडांची नावे पुढे येण्याची शक्यता

विमा फसवणुकीचा ‘मास्टर माइंड’ मोरेवाडीचा
एकनााथ पाटील - कोल्हापूर
विमा फसवणूक प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. काही राजकीय लोकप्रतिनिधींचाही या प्रकरणात समावेश असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. कोल्हापूरपासून मुंबईपर्यंत बोगस विमा पॉलिसीचे रॅकेट चालविणारा ‘मास्टर माइंड’ मोरेवाडीचा आहे. संशयित शक्ती दिलीप माटुंगे (रा. मोरेवाडी) असे त्याचे नाव आहे. पोलीस रेकॉर्डवर ‘वाँटेड’ असलेल्या हा ‘शक्ती’ पोलिसांच्या हाती लागल्यानंतर अनेक बड्या धेंडांची नावे पुढे येणार आहेत.
मृत व्यक्तीच्या नातेवाइकांना पैशांचे आमिष दाखवून मृताच्या नावे विमा पॉलिसी उतरवून लाखो रुपये कमाविणाऱ्या रॅकेटचा डाव लक्ष्मीपुरी पोलिसांनी उजेडात आणला आहे. या प्रकरणी विमा कंपनीच्या सेल्स मॅनेजरसह डॉक्टर, मृताचे नातेवाईक, एजंटांना पोलिसांनी अटक केली होती.
या प्रकरणाचा ‘मास्टर माइंड’ अजूनही मोकाटच फिरत आहे. आलिशान बंगल्यात राहणाऱ्या ‘मास्टर माइंड’ने सुरुवातीस मोरेवाडीतील केदारनगर परिसरात एक नव्हे, तर तब्बल सात हातभट्ट्या सुरू केल्या. त्या सुरू करण्यासाठी त्याने खाकी वर्दीशी हातमिळवणी केली. हळूहळू त्याने जोडधंदा म्हणून जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू केला. वादविवादाच्या जमिनींचे व्यवहार करून त्याने त्यामधून लाखो रुपये मिळविले. अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळू लागल्याने त्याची चैनी वाढली. त्याने मित्र छगन भाट (रा. कंदलगाव) याच्या मदतीने विमा कंपन्यांना हाताशी धरून मृत व्यक्तींच्या नावे बोगस पॉलिसी काढून लाखो रुपये कमविण्याची शक्कल लढविली. त्यासाठी या दोघांनी डॉक्टर, नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, ग्रामसेवक या यंत्रणेसह मृत व्यक्तींच्या नातेवाइकांना हाताशी धरून लाखो रुपये मिळविण्यास सुरुवात केली.
मृत व्यक्ती शोधण्यासाठी त्यांनी एजंटांचे जाळेही जिल्ह्णात पेरले आहे. मृतांच्या टाळूवरील लोणी खाऊन कोट्यवधी रुपयांची माया मिळविणारा ‘मास्टर माइंड’ पोलिसांच्या हाती लागल्यानंतर अनेक बड्या धेंडांची नावे पुढे येणार आहेत. त्याच्यासह त्यांचे साथीदार छगन भाट, सचिन मछले (मोतीनगर), बिनाबाई भाट (शहापूर), आदी फरार आहेत.
बोगस विमा पॉलिसी फसवणूक प्रकरणात संशयित शक्ती माटुंगे हा मुख्य सूत्रधार आहे. तो व त्याचे अन्य साथीदार पसार असून, त्यांचा आम्ही शोध घेत आहोत.
- एस. एस. पांचाळ,
पोलीस उपनिरीक्षक