मसाज सेंटरचे 'सोनेरी' जाळे

By Admin | Updated: November 27, 2014 00:14 IST2014-11-26T23:55:03+5:302014-11-27T00:14:28+5:30

शहरात डझनभर सेंटर : उच्चभ्रू परिसरात राजरोसपणे वेश्याव्यवसाय; गैरप्रकारांना आळा घालण्याची गरज

Massage Center's 'golden' network | मसाज सेंटरचे 'सोनेरी' जाळे

मसाज सेंटरचे 'सोनेरी' जाळे

एकनाथ पाटील - कोल्हापूर -तारुण्याचा साज वाढविण्यासाठी इकडे-तिकडे भटकू नका, निराशा टाळा, एकदा विश्वास ठेवा, परत आलाच पाहिजे, सेपरेट रूम, नवीन फ्रेश लेडिज स्टाफसह स्टीम बाथ, स्वच्छ सुंदर वातावरणात फुल्ल बॉडी मसाज घ्या आणि रिलॅक्स व्हा. एकदा याल तर पुन्हा याल.. ‘नाव सोनेरी... मसाजही सोनेरी’, अशा जाहिरातीच्या नावाखाली शहरात डझनभर मसाज सेंटरमध्ये राजरोस वेश्याव्यवसाय सुरू आहे.
पोटासाठी वेश्याव्यवसाय करणाऱ्या वेश्यांना पोलीस त्रास देतात; पण मसाज सेंटरच्या नावाखाली कॉलगर्ल्स पुरवून दररोज लाखोंची माया गोळा करणाऱ्या दलालांकडे मात्र ते सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करीत आहेत.
गेल्या दीड वर्षात आर. के. नगर, शिंगणापूर, कळंबा, आदी ठिकाणी कुंटणखाना चालविणाऱ्या दलालांवर पोलिसांनी कडक कारवाई केली. पण पोलीस तसेच नागरिकांना या गैरव्यवहाराची कार्यपद्धती समजल्याने दलालांनी पद्धत बदलली आहे. राजारामपुरी, शाहूपुरी, नागाळा पार्क, आदी उच्चभ्रू परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविला जात आहे. त्यांनी केलेली पार्लरची जाहिरात पाहून कोणीही याठिकाणी देहविक्रीचा व्यवसाय सुरू असेल अशी शंका घेत नाही. पालिका प्रशासनाकडे सेंटर सुरू करण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून अर्ज दाखल केला जातो. एक हजार ८० रुपये भरून अशा सेंटरना कायदेशीर परवानगी दिली जाते. मसाज सेंटरच्या नावाने चालणाऱ्या अड्ड्यांंमध्ये ग्राहकाच्या आर्थिक ऐपतीप्रमाणे प्रथम पाचशे ते दीड हजार रुपये मसाजसाठी घेतले जातात. मसाज करताना ग्राहकाने पुढील मागणी केल्यास चार ते पाच हजार रुपये घेऊन वेश्याव्यवसाय केला जातो. मसाज सेंटरच्या असलेल्या अल्बममध्ये तरुणींची छायाचित्रांसह माहिती उपलब्ध असते. कोल्हापुरात अनेक मसाज सेंटर कारवाईच्या टप्प्याबाहेर आहेत. त्यांचा व्यवसाय राजरोस सुरू आहे.


श्
सेंटरमधील वातावरण
मसाज सेंटरच्या दरवाजातून आतमध्ये गेल्यावर प्रथमत: एका भांड्यात पाण्यामध्ये कमळ ठेवलेले असते. भिंतीवर मसाजच्या विविध प्रकारांच्या माहितीचे डिजिटल फलक चिकटविलेले असतात. सुरुवातीस स्वागत कक्षाजवळ बसलेली तरुणी आलेल्या गिऱ्हाइकाची डायरीमध्ये नोंद करून घेते. त्यानंतर कोणता मसाज करणार त्याचा फोटो अल्बम दाखविला जातो. त्यानंतर मसाजचे शुल्क आकारून आतमध्ये बंद खोलीमध्ये त्यांना शाही मसाज करण्यास पाठविले जाते. ..


उच्चशिक्षितांचा सहभाग
मसाज सेंटरमध्ये काम करणाऱ्या काही तरुणी पदवीधर, इंग्रजी व हिंदी बोलणाऱ्या आहेत. वर-वर त्या कॉलेज कुमारिका वाटतात. त्यांचे राहणीमानपाहून त्या असा काही व्यवसाय करीत असतील, असा संशयही कोणाला येणार नाही. फसवून आणलेल्या, मैत्रिणीच्या संगतीने गंमत, चेंज म्हणून आलेल्या आणि यात अडकलेल्यांचा, डान्सबार गर्लचा सहभाग आहे.


मनात आणलं तर..
कोणत्या मसाज सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय चालतो हे पोलिसांना माहीत नाही असे म्हणणे हास्यास्पद आहे.
जे सामान्य लोकांना दिसते, ते पोलिसांना दिसत नाही, असे म्हणता येणार नाही.
पोलिसांनी आता फक्त एकाच सेंटरवर कारवाई केली आहे. त्यांनी जर मनात आणलं, तर डझनभरपेक्षा जास्त मसाज सेंटर उद्ध्वस्त होतील.

मसाज सेंटरमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील कोणत्या मसाज सेंटरमध्ये असा प्रकार आढळून आल्यास नागरिकांनी त्वरित पोलिसाशी संपर्क साधावा.
- डॉ. मनोजकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक

पालिकेत १०८० रुपयांत मसाज सेंटरची नोंदणी
नोंदणीचा गैरकामासाठी वापर
दररोज शहरात होते लाखोची उलाढाल
डान्सबार बंद झाल्याने अनेक मुली या व्यवसायात

Web Title: Massage Center's 'golden' network

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.