कोनवडे येथे आज शिवधर्मानुसार विवाह
By Admin | Updated: January 18, 2015 00:36 IST2015-01-18T00:33:51+5:302015-01-18T00:36:54+5:30
महामानवांच्या विचारांच्या मंगलाष्टका : रात्री व्याख्यान; अनावश्यक खर्चाला फाटा

कोनवडे येथे आज शिवधर्मानुसार विवाह
शिवाजी सावंत / गारगोटी
लग्न म्हटले की, अनावश्यक, वारेमाप खर्च, मानपान, रुसवे-फुगवे, काही वेळा अन्नाची नासाडी आणि रात्री वरातीत धांगडधिंगा, त्यातून होणारे वाद यामुळे लग्नाच्या आनंदावर विरजण पडते. हे सारे टाळण्यासाठी लग्न हा आनंदाचा सोहळा तसेच विचारांचा जागर होण्यासाठी केनवडे (ता. भुदरगड) येथील फौजदार राजेंद्र गुरव शिवधर्मानुसार विवाहबद्ध होणार आहेत. तासगाव (जि. सांगली) येथील तेजश्री गुरव हिच्याशी रविवारी (दि. १८) ते जन्मोजन्मीची सोबत करतील. तेजश्री या पदवीधर असून त्यांनाही अशा पद्धतीचा विवाह होणे सामाजिक बदलाच्या दृष्टीने आवश्यक वाटते.
फौजदार गुरव यांच्या लग्नात छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, संत तुकाराम या महामानवांच्या विचारांचा जागर करणाऱ्या मंगलाष्टका म्हणण्यात येणार आहेत, तर अक्षता म्हणून तांदळाऐवजी फुले टाकण्यात येणार आहेत. अतिशय साध्या पद्धतीत ज्येष्ठ विचारवंत राजू शिरगुप्पे यांच्या हस्ते हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. रात्री वराती ऐवजी नांदेड येथील अमोल मिटकरी यांचे ‘छत्रपती संभाजी महाराजांचा वैज्ञानिक दृष्टिकोन व आजचा समाज’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
यापूर्वी गुरव यांचे थोरले बंधू रवींद्र यांनीही आपला विवाह पारंपरिक विधींना फाटा देऊन केला होता. दोन्ही बंधू स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानच्यावतीने अनिष्ठ प्रथेला फाटा देऊन नवविचार समाजात रुजविण्याचा प्रयत्न करीत आहेत. राजेंद्र व तेजश्री यांचा हा अनोखा विवाह सोहळा पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.