ईदच्या खरेदीसाठी बाजारपेठा गजबजल्या
By Admin | Updated: July 4, 2016 00:35 IST2016-07-04T00:35:24+5:302016-07-04T00:35:24+5:30
कपडे, सुका मेवा खरेदीला प्राधान्य : ‘शबे कद्र’च्या निमित्ताने मुस्लिम बांधवांकडून नामस्मरण, नमाज, कुराणाचे पठण

ईदच्या खरेदीसाठी बाजारपेठा गजबजल्या
कोल्हापूर : अवघ्या तीन दिवसांवर आलेल्या मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान ईदमुळे शहरातील बाजारपेठा खरेदीसाठी गर्दीने गजबजून गेल्या. कपड्यांसह सुका मेवा, अत्तरे यांचा प्रामुख्याने खरेदीत समावेश होता.
सायंकाळी चारनंतर पावसाने थोडी विश्रांती दिल्याने खरेदीचा ओघ वाढला होता. यामध्ये कपडे, सुकामेवा खरेदीला प्राधान्य देण्यात येत होते.
रेडीमेड कपड्यांमध्ये बाजीराव मस्तानी ड्रेसला मोठी मागणी आहे. मराठी चित्रपट ‘सैराट’मधील ड्रेसलाही युवावर्गाची पसंती आहे. यासह लाँग कुर्तीज, लाशा, शरारा, अनारकली, कॉटन प्रिंट, मटेरिअलला मोठी मागणी आहे. ईदबरोबर काही दुकानांमध्ये मान्सून सेल लागल्याने या ठिकाणीही खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती.
कपड्यांच्या खरेदीबरोबरच त्या दिवशीचा महत्त्वाचा शिरकुर्मा अर्थात खिरीची साहित्यखरेदीही मोठ्या प्रमाणात होत आहे. यामध्ये बदाम, काजू, चारोळी, खारीक, खोबरे, वेलदोडे, केशर, आक्रोड, मगज बी, नियमित हातांवर वळलेल्या शेवया, मिरज येथील भाजकी शेव यांना मागणी अधिक आहे. विशेष म्हणजे काजूचा दरही ८०० ते ९०० रुपये प्रतिकिलो असा प्रतवारीनुसार आहे. बाजारपेठेत आणखी दोन दिवस अशीच गर्दी राहण्याची चिन्हे आहेत. या खरेदीबरोबरच सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सुगंधी अत्तरेही बाजारात आली आहेत. यामध्ये होमी, मुफ्ती, माही, आइसबॉय, ब्लू लूमानी, मस्क, या परदेशी अत्तरांचा बोलबाला अधिक आहे. मुस्लिम बांधवांनी बिंदू चौक येथील ईद फेस्टिव्हल, महाद्वार रोड, जोतिबा रोड, इब्राहिम खाटीक चौक, हत्तीमहल रोड, माळकर तिकटी, पापाची तिकटी, राजारामपुरी, शाहूपुरी येथील दुकानांमध्ये गर्दी केली होती.
शबे कद्र (बडी रात)
४रमजानच्या या पवित्र महिन्यामध्ये एक महत्त्वाची रात्र म्हणून ‘शबे कद्र’ (बडी रात) २६ व्या रोजाच्या मगरीबच्या नमाजापासून सुरू झाली. ही रात २७ व्या अर्थात रविवारच्या इफ्तारी ७.१४ वाजता संपली.
४हा रोजा मुस्लिम बांधवांसह अन्य धर्मीयांनी मोठ्या उत्साहात केला. यामध्ये मुस्लिम बांधवांनी अल्लाहचे नामस्मरण, नमाज पठण, कुराण पठण केले. हा रोजा बाबूजमाल दर्गा, बडी मस्जिद येथे हिंदू-मुस्लिम महिलांनी एकत्रितरीत्या सोडला.
यंदा राज्यावर दुष्काळी सावट होते. मात्र, पावसाने शेतकऱ्यांना थोडा दिलासा दिल्याने यंदा ईद उत्साहात साजरी होईल. याकरिता नवीन आधुनिक फॅशनचे कपडे, बुरखा, जॅकेट, टोपी यासह हातातील तस्बी अर्थात जप करण्यासाठीची अंगठीही बाजारात आली आहे. गेले दोन दिवस पावसाची रिमझिम आहे; परंतु त्यातही ग्राहकांचा उत्साह चांगला आहे.
- फारूख मोमीन, दान कलेक्शन
देव एकच असतो, या शिकवणीप्रमाणे ‘बडी रात’चा हा २७ वा रोजा मुस्लिम महिलांबरोबरच गेली कित्येक वर्षे काही अन्यधर्र्मीय महिलाही मोठ्या भक्तिभावाने करतात. ही परंपराच दोन्ही समाजांमध्ये एकोपा निर्माण करते. म्हणूनच बाबूजमाल दर्गा येथे दरवर्षी नियमित पहाटे उपवास धरून तो सायंकाळी सोडण्यासाठी आम्ही जमतो.
- मंगल महादेव साळोखे,
कोल्हापूर