दिवाळीसाठी बाजारपेठा फुलल्या
By Admin | Updated: October 21, 2014 23:41 IST2014-10-21T21:11:34+5:302014-10-21T23:41:20+5:30
वस्त्रनगरी सज्ज : चायना मालाचे वर्चस्व, करोडो रुपयांची उलाढाल अपेक्षित

दिवाळीसाठी बाजारपेठा फुलल्या
इचलकरंजी : येथील वस्त्रनगरी दिवाळीसाठी सज्ज झाली आहे. बाजारपेठेत रंगीबेरंगी आकाशकंदील, शोभेच्या वस्तू, रांगोळी, कपडे यांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. बाजारपेठेत सरासरी वीस टक्क्यांनी महागाईमध्ये वाढ दिसत असून, ७५ टक्के चायना मालाने बाजारपेठेवर वर्चस्व निर्माण केले आहे. निवडणूक निकालानंतर बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी दिसत आहे. तर दिवाळीच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती.
इचलकरंजी शहरातील मेन रोडसह जनता चौक, गांधी पुतळा चौक, डेक्कन चौक या परिसरात स्टॉल उभारण्यात आले आहेत. यामध्ये आकर्षक आकाशकंदील, रांगोळी, शोभेच्या वस्तू, पणत्या, मेणबत्या, रंगीबेरंगी हार, लहान मुलांसाठी खेळणी, किल्ल्यावरचे साहित्य, तयार किल्ले, सैनिक यांसह कपड्यांचे स्टॉल यांचा समावेश आहे. कापड मार्केट, बीजेपी मार्केट या परिसरातही कपड्यांची दुकाने सजली आहेत. बाजारपेठेमधील वस्तूंमध्ये सुमारे ७५ टक्के वस्तू चायना मेड आहे. स्थानिक तयार झालेल्या वस्तूंपेक्षा या वस्तूंची किंमत तुलनात्मकरीत्या खूपच कमी असल्याने ग्राहकही त्याकडे आकर्षित होत आहेत. बाजारपेठेमध्ये वीस ते पंचवीस टक्क्यांनी सर्व वस्तूंमध्ये वाढ झाली आहे. वस्त्रनगरीमध्ये मालक व कामगार असे दोन मुख्य वर्ग असल्याने बोनस वाटपानंतरच खऱ्या अर्थाने खरेदीला सुरुवात होते. गत चार दिवसांपासून बोनस वाटप झाल्यामुळे बाजारपेठेत गर्दी फुलू लागली आहे. दरवर्षी दिवाळीला वस्त्रनगरीत करोडो रुपयांची उलाढाल होते. त्या पार्श्वभूमीवर दुकानदारांनी व स्टॉलधारकांनी मोठ्या प्रमाणात माल भरला आहे. (प्रतिनिधी)
आजरा बाजारपेठेत
खरेदीसाठी गर्दी
आजरा : पावसाने लावलेली समाधानकारक हजेरी, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुका याचा परिणाम आजरा तालुक्यात दिवाळीच्या खरेदीवर दिसत असून, बाजारात मोठी गर्दी दिसत आहे. प्राधान्याने कपडे, आकाशकंदील, सोन्याचे जिन्नस, खरेदीकरिता मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसत आहे. बहुतांशी सहकारी संस्थांनी सानुग्रह अनुदान व बोनस स्वरूपात कर्मचारी वर्गास दिवाळी भेट दिल्याचा परिणाम बाजारात जाणवत आहे.
व्हॉटस अॅप, फेसबुकवरून खरेदीचा संदेश
देशामधील चायनाची गुंतवणूक कमी व्हावी. त्याचबरोबर देशाला आर्थिक बळकटी मिळावी, यासाठी चायना वस्तू वापरापासून दूर राहा व स्वदेशी वस्तू वापरा आणि पणत्या व दिवाळी शोभेसाठी लागणारे काही साहित्य, फळे या वस्तू रस्त्याकडेला बसलेल्या गरीब व गरजूंकडून खरेदी करा. मोठ्या व्यापारी व दुकानांतून खरेदी करणे टाळून गरजूंना आर्थिक लाभ होईल यासाठी प्रयत्न करा, असे सामाजिक संदेश आजकाल व्हॉटस अॅप व फेसबुक या सोशल मीडियावरून फिरत आहेत. त्याला काही प्रमाणात प्रतिसादही मिळत असल्याचे दिसत आहे.