बाजार समितीची पाच कोटींची उलाढाल ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:21 IST2021-05-17T04:21:26+5:302021-05-17T04:21:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात रविवारपासून कडक लॉकडाऊन सुरू झाल्याने त्याचा परिणाम सर्वत्र दिसत आहे. शेतीमाल विक्री ...

बाजार समितीची पाच कोटींची उलाढाल ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात रविवारपासून कडक लॉकडाऊन सुरू झाल्याने त्याचा परिणाम सर्वत्र दिसत आहे. शेतीमाल विक्री बंद असल्याने कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीची पहिल्याच दिवशी पाच कोटींची उलाढाल ठप्प झाली. सुमारे ८ हजार क्विंटल शेतीमाल घरातच राहिला असून, समितीला आर्थिक फटका बसला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. मृत्यूचे प्रमाणही सर्वाधिक असल्याने जिल्हा प्रशासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आठ दिवसांचे कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. दूध व मेडिकल वगळता सर्व व्यवहार बंद ठेवले आहेत. मागील लॉकडाऊनमध्ये भाजीपाला खरेदी-विक्रीची मुभा होती. मात्र, यावेळेला शेतीमाल विक्रीही बंद केली आहे. त्यामुळे कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला, फळे, कांदा, बटाट्यासह सर्वच मार्केट सामसुम होते.
बाजार समितीमध्ये रोज भाजीपाला २५०० क्विंटल, फळे १ हजार क्विंटल, तर कांदा-बटाटा सुमारे साडेचार हजार क्विंटलची आवक होते. याशिवाय गूळ व इतर विभागातही आवक होते. लॉकडाऊनमुळे सुमारे आठ हजार क्विंटल शेतीमाल घरातच राहिला. पाच कोटींची उलाढाल ठप्प झाली असून, त्यातून बाजार समितीलाही आर्थिक झळ बसली आहे. उलाढालीवर १ टक्का कर आकारणी असते, त्यामुळे समितीला पहिल्याच दिवशी पाच लाखांचा फटका बसला.
कोट-
जिल्हा प्रशासनाच्या निर्णयानुसार रविवारपासून बाजार समितीमधील सर्व व्यवहार बंद आहेत. साधारणत: येथे रोज ८ हजार क्विंटलची आवक होते, ती पूर्णपणे थांबली.
- जयवंत पाटील (सचिव, बाजार समिती)
फोटो -
कोल्हापुरात रविवारपासून कडक लॉकडाऊन करण्यात आल्याने कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये अशी सामसूम होती. (फोटो-१६०५२०२१-कोल-बाजार समिती, बाजार समिती०१) (छाया- नसीर अत्तार)