कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यात रताळीची विक्री होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर कोल्हापूरची शेती उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी शेष वसुलीसाठी गेले होते. यावेळी शेतकरी, व्यापारी व समिती कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी होऊन दोन कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याचे समजते.नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या शाहूवाडी तालुक्यात रताळीची काढणी सुरू आहे. रताळी कोल्हापूर बाजार समितीत न आणता परस्पर बाहेर विक्री होत असल्याच्या तक्रारी समिती प्रशासनाकडे आल्या होत्या. याची तपासणी करण्यासाठी रविवारी सकाळी बाजार समितीची एक उपसचिव व काही लिपिकांचे पथक शाहूवाडीमध्ये गेले होते.सरूड ते सागाव दरम्यान रताळी घेऊन मुंबईला जाणारे वाहन कर्मचाऱ्यांनी अडविले. यावेळी संबंधित शेतकरी व्यापारी व कर्मचाऱ्यांमध्ये सेसवरून वादावादी झाली. यामध्ये समितीच्या दोन कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याचे समजते.
शाहूवाडीतील रताळी एक नंबर असताना फुका पारसी दराने बाहेरचे व्यापारी खरेदी करतात. शेतकऱ्यांना चार पैसे जास्त मिळावेत म्हणून आमचा प्रयत्न आहे. त्यातून हा प्रकार झाला आहे. - सूर्यकांत पाटील (सभापती, बाजार समिती)