डोक्यात घाव घालून विवाहितेचा खून
By Admin | Updated: August 7, 2014 00:16 IST2014-08-06T22:50:23+5:302014-08-07T00:16:23+5:30
कऱ्हाडातील घटना : कारण अस्पष्ट; आरोपी पसार

डोक्यात घाव घालून विवाहितेचा खून
कऱ्हाड : येथील उर्दू हायस्कूलसमोरच्या झोपडपट्टीत वास्तव्यास असलेल्या महिलेच्या डोक्यात घाव घालून तिचा निर्घृण खून करण्यात आला़ आज, बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली़ रेहाना यासीन सुतार (वय २५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेंट्रिंग व्यावसायिक असणारा यासीन सुतार हा शहरातील उर्दू हायस्कूलसमोरील झोपडपट्टीत पत्नी रेहाना व तीन मुलांसह वास्तव्यास आहे़ यासीन हा कामानिमित्त शहराबाहेर जात होता. गेल्या काही महिन्यांपासून यासीन सांगली येथे कामासाठी गेला आहे, तर त्याची पत्नी रेहाना ही मुलांसह कऱ्हाडातच वास्तव्यास होती़
दरम्यान, आज सकाळी रेहाना यांच्या घराचा दरवाजा बंद असल्याचे शेजारील महिलांच्या निदर्शनास आले़ सुरुवातीला त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले़ मात्र, साडेनऊ वाजूनही रेहानाने दरवाजा न उघडल्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला़ त्यांनी दरवाजा ठोठावूनही आतून कसलाच प्रतिसाद आला नाही़ त्यामुळे झोपडपट्टीतील इतर नागरिकांनी त्याठिकाणी गर्दी केली़ सर्वांनी दरवाजा उघडून घरात जाऊन पाहिले असता रेहाना रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले़ याबाबतची माहिती मिळाल्यानंतर कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी तातडीने त्याठिकाणी दाखल झाले़ त्यांनी परिसराची पाहणी केली़ रेहानाच्या डोक्यात वर्मी घाव घालण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले़ वर्मी घाव व अती रक्तस्त्राव झाल्यामुळे रेहानाचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले़ घटनेची नोंद कऱ्हाड शहर पोलिसांत झाली आहे़