कागलमध्ये विवाहितेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
By Admin | Updated: May 8, 2014 12:18 IST2014-05-08T12:18:26+5:302014-05-08T12:18:26+5:30
मृत्यू संशयास्पद असल्याचा भावाचा आरोप

कागलमध्ये विवाहितेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
कागल : येथील दावणे वसाहतीमधील पूजा महेश दावणे (वय २७) या विवाहितेचा विजेच्या प्रवाहाचा धक्का लागून आज (बुधवार) मृत्यू झाला. ही घटना दुपारी तीनच्या सुमारास तिच्या राहत्या घरी घडली. पूजा हिचे पूर्वाश्रमीचे नाव गुलनाज असे असून, तिचा मृत्यू संशयास्पद असल्याची तक्रार तिचा भाऊ मैनुद्दीन अब्दुलरशीद शेख (रा. मुजावर गल्ली, कागल) याने कागल पोलिसांत दिली आहे. घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांनी कागल पोलीस ठाण्यास भेट देऊन माहिती घेतली. आज दुपारी तीनच्या सुमारास दावणे वसाहतीमधील घरात पाण्याची इलेक्ट्रिक मोटार सुरू करताना वायरीमध्ये आलेल्या विद्युत प्रवाहाने पूजा हिला जोराचा धक्का बसला. त्यामध्ये ती जागीच ठार झाली. येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर तिचा मृतदेह सासरच्या नातेवाइकांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. पूजा आणि महेश यांचा दीड वर्षांपूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता. दरम्यान, पूजा उर्फ गुलनाज हिचा भाऊ मैनुद्दीन याने कागल पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आपली बहीण गुलनाज हिला तिचा पती महेश, सासरा शिवाजी, सासू गंगूबाई, नणंद सरिता यांच्याकडून शारीरिक व मानसिक छळ होत होता. आज बहिणीच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर मी ग्रामीण रुग्णालयात गेलो असता मला व माझ्या घरातील नातेवाइकांना तिचा मृतदेह पाहू दिलेला नाही. माझी आई मुलीचा मृतदेह पाहणार आहे, असे सांगण्यासाठी माझे दाजी अकबर नाईकवडे गेले असता त्यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. मला व आमच्या नातेवाइकांना सासरच्या लोकांकडून धोका आहे. (प्रतिनिधी)