दाक्षिणात्य वाहिनीवर मराठी मालिका, कोल्हापुरात चित्रीकरण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:28 IST2021-09-17T04:28:45+5:302021-09-17T04:28:45+5:30

कोल्हापूर : दाक्षिणात्य वाहिनीने आता मराठीतही एन्ट्री केली असून, कोल्हापूर चित्रनगरीमध्ये गजानन महाराजांवरील ‘संत गजानन शेगाविचे’ या मराठी मालिकेच्या ...

Marathi series on Dakshinatya Vahini, shooting starts in Kolhapur | दाक्षिणात्य वाहिनीवर मराठी मालिका, कोल्हापुरात चित्रीकरण सुरू

दाक्षिणात्य वाहिनीवर मराठी मालिका, कोल्हापुरात चित्रीकरण सुरू

कोल्हापूर : दाक्षिणात्य वाहिनीने आता मराठीतही एन्ट्री केली असून, कोल्हापूर चित्रनगरीमध्ये गजानन महाराजांवरील ‘संत गजानन शेगाविचे’ या मराठी मालिकेच्या प्रत्यक्ष चित्रीकरणास गुरुवारी प्रारंभ झाला आहे. यासाठी भव्य सेट उभारला असून, या मालिकेत कोल्हापुरातील बऱ्याच कलाकार आणि तंत्रज्ञांचा समावेश आहे.

सन टीव्ही मराठी या दाक्षिणात्य वाहिनीच्या नव्या मराठी मालिकेचा मुहूर्त गुरुवारी चित्रनगरीत पार पडला. प्रत्यक्ष चित्रीकरणालाही प्रारंभ झाला असून, मालिकेचे सलग तीन वर्षे कोल्हापुरात चित्रीकरण होणार आहे. गजानन महाराजांची भूमिका अमित पाठक करणार आहेत. त्यात कोल्हापुरातील कलाकारांचा सहभाग आहे. ३ सप्टेंबर रोजी याठिकाणी या वाहिनीने भूमिपूजन केले होते. याशिवाय येथे दोन हिंदी, एक मराठी आणि एका कोकणी मालिकेचेही चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे.

कोल्हापुरात यापूर्वीही अनेक हिंदी तसेच मराठी चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण झाले आहे. मराठीचा सुवर्णकाळ कोल्हापूरने अनुभवला आहे. प्रभात, जयप्रभा, शालिनी आणि शांतकिरणसारख्या स्टुडिओंमध्ये अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे आणि अनेक कलावंतांनी कोल्हापूरचे नाव जगाच्या नकाशावर नेले आहे. गेल्या काही वर्षांत अनेक मालिकांनीही कोल्हापूरला प्राधान्य दिलेले आहे. यात जयप्रभा स्टुडिओत पूर्ण झालेल्या कृष्णा या हिंदी मालिकेचाही समावेश आहे.

निसर्गरम्य ठिकाणे, डोंगरपठारे, विपुल जैवविविधता, ऐतिहासिक वातावरण जपणारे गडकिल्ले, भुरळ पाडणारे तलाव यामुळे निर्मात्यांना आणि कलाकारांना नेहमीच कोल्हापूरला प्राधान्य दिले आहे. याशिवाय कलाकारांची, तंत्रज्ञांची उपलब्धता, पुणे-मुंबईला जवळचे ठिकाण म्हणूनही कोल्हापूरकडे ओढा आहे.

मालिका, चित्रपटांसाठी कोल्हापूरचा विचार

मधल्या काळात चित्रीकरण होत नव्हते. मात्र, शासनाने निधी उपलब्ध करून कोल्हापूर चित्रनगरीत विविध लोकेशन्स उभारली आहेत, अजूनही काही विकसित होत आहेत. त्यामुळे गोरेगावला पर्याय म्हणूनही अनेक हिंदी, मराठी निर्मात्यांनी कोल्हापूरचा विचार केला. आता दाक्षिणात्य निर्मात्यांनीही कोल्हापूरला पसंती दिल्याने भविष्यात दक्षिणेकडील मालिका, चित्रपटही कोल्हापुरात चित्रित होतील, अशी आशा आहे.

कोट

दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू होत असलेली मराठी वाहिनीवर ही मालिका दिसणार असून याच वाहिनीसाठी आणखी एका मराठी मालिकेचेही चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे, तसेच दोन हिंदी मालिकांनीही तयारी दर्शविली आहे.

-संजय कृष्णा पाटील,

व्यवस्थापकीय संचालक, कोल्हापूर चित्रनगरी महामंडळ.

----------------------------------

फोटो : 16092021-kol-Marathi shooting

फोटो ओळ : कोल्हापूर चित्रनगरीत दाक्षिणात्य वाहिनीच्या मराठी मालिकेच्या चित्रीकरणास गुरुवारी प्रारंभ झाला.

16092021-kol-Marathi shooting1

फोटो ओळ : कोल्हापूर चित्रनगरीत दाक्षिणात्य वाहिनीच्या मराठी मालिकेच्या चित्रीकरणास गुरुवारी प्रारंभ झाला.

Web Title: Marathi series on Dakshinatya Vahini, shooting starts in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.