दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेमार्फत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:20 IST2021-01-17T04:20:58+5:302021-01-17T04:20:58+5:30
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ ,मुंबई आणि कोल्हापूर दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेमार्फत दिनांक १९ ते २८ ...

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेमार्फत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ ,मुंबई आणि कोल्हापूर दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेमार्फत दिनांक १९ ते २८ जानेवारीपर्यंत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जात आहे. यानिमित्त कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात विविध कार्यक्रम होणार आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात व्याख्यान, कवी संमेलन, लेखक भेट असे वेगळे कार्यक्रम ठेवण्यात आल्याची माहिती दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष विजय चाेरमारे आणि कार्यवाह गोविंद पाटील यांनी दिली.
गगनबावडा तालुक्यातील तिसंगी येथील म. ह. शिंदे महाविद्यालयात सह्याद्री साहित्य मंच, गगनबावडा यांच्यामार्फत ‘मराठी भाषेची उपयोगिता’ या विषयावर १९ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता अशाेक पाटील यांचे व्याख्यान, २१ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता रफिक सुरज यांच्या अध्यक्षतेखाली इचलकरंजी नाईट कॉलेज येथे ऑनलाईन कवी संमेलन, तर २७ जानेवारी रोजी भुदरगड येथील गावशिवार साहित्य मंच यांच्यामार्फत सकाळी १०.३० वाजता सांगलीचे लेखक नामदेव माळी यांच्याशी लेखक भेट कार्यक्रम होणार आहे.
सांगली जिल्ह्यात होणार नवलेखक कार्यशाळा, कवी संमेलन
यानिमित्त साहित्य सभेमार्फत २३ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत सांगली जिल्ह्यातील समडोळी हायस्कूल येथे ‘एकदिवसीय नवलेखक कार्यशाळा’ होणार असून, यात नामदेव माळी, नामदेव भोसले, दयासागर बन्ने व अन्य साहित्यिक सहभागी हाेणार आहेत, तर २५ जानेवारी रोजी भीमराव धुळूबुळू यांच्या अध्यक्षतेखाली अजितराव घोरपडे हायस्कूल, कळंबी, ता. मिरज, जि. सांगली येथे त्यांच्या संयाेजनाखाली सकाळी १० वाजता कवी संमेलन होणार आहे.
(संदीप आडनाईक)