‘मार्केटिंग’मध्ये मराठा समाज मागे
By Admin | Updated: August 15, 2014 00:22 IST2014-08-14T23:53:37+5:302014-08-15T00:22:12+5:30
नीतेश राणे : मराठा समाजातील मान्यवरांचा सन्मान सोहळा

‘मार्केटिंग’मध्ये मराठा समाज मागे
कोल्हापूर : जिद्द, कष्ट, प्रामाणिकपणा, साहस असे अनेक गुण मराठा समाजात आहेत; परंतु इतर समाजांप्रमाणे स्वत:चे ‘मार्केटिंग’ करण्यात हा समाज कमी पडतो, असे सांगून आरक्षणाचा लाभ घेऊन व्यापार-उद्योग क्षेत्रांत मराठा समाजातील युवकांनी पुढे जावे, असे आवाहन स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नीतेश राणे यांनी आज, गुरुवारी येथे केले.
राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सह्याद्री फौंडेशन व चव्हाण ग्रुप आॅफ कंपनीज्तर्फे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणाऱ्या मान्यवरांचा महासन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार होते. जिल्हा परिषदेचे सदस्य धैर्यशील माने, सम्राट महाडिक, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कुलगुरू पवार यांच्या हस्ते स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नीतेश राणे, संभाजी ब्रिगेडचे सरचिटणीस शांताराम कुंजीर, ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांचा सत्कार करण्यात आला.
राणे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय मंत्री नारायण राणे यांनी घेतला आहे, त्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. मराठा समाजाला आता आरक्षण मिळाले आहे. याचा फायदा उठवीत समाजातील युवकांनी भविष्याकडे वाटचाल करावी. सहसा मराठा समाजात एकजूट पाहायला मिळत नाही; परंतु या ठिकाणी मराठा समाज एकत्र आल्याचे पाहून आनंद वाटत आहे. हे गुण आजच्या युवकांनी आत्मसात करून एकमेकांना हात देण्याचे काम केले पाहिजे.
कुलगुरू पवार म्हणाले, सर्वांना बरोबर घेऊन जाण्यासाठी शिक्षण हे माध्यम आहे. यामध्ये समाज मागे पडला तर उन्नती होत नाही. मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाचा निश्चित फायदा आताच्या पिढीला मिळेल. त्याचा त्यांनी लाभ घेण्याची गरज आहे.
यावेळी धैर्यशील माने यांचेही भाषण झाले. चव्हाण ग्रुप आॅफ कंपनीज व सह्याद्री फौंडेशन (पुणे)चे अध्यक्ष सतीश चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. चंद्रकांत पाटील यांनी सूत्रसंचालन केले. गुरुबाळ माळी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)