विद्यापीठ भरतीत आरक्षण द्या मराठा संघटनांची मागणी
By Admin | Updated: July 15, 2014 01:00 IST2014-07-15T01:00:06+5:302014-07-15T01:00:26+5:30
अध्यादेश तातडीने अमलात आणावा कोल्हापूर :

विद्यापीठ भरतीत आरक्षण द्या मराठा संघटनांची मागणी
मराठा आरक्षणाचा अध्यादेश राज्य शासनाने काढला आहे. शिवाजी विद्यापीठाकडून सध्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेत विद्यापीठ प्रशासनाने मराठा आरक्षणाचा विचार करावा. शासनाचा आरक्षणाचा अध्यादेश अमलात आणावा, अशी मागणी कोल्हापुरातील विविध मराठा संघटनांनी केली आहे. मराठा आरक्षणाचा वटहुकूम निघण्याची प्रक्रिया सुरू असताना देखील शिवाजी विद्यापीठाने दहा शिक्षक आणि शिक्षकेतरमधील भांडारपाल, लघुलेखक अशा विविध पदांच्या ३२ जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे या भरतीपासून मराठा समाजातील आरक्षणामुळे पात्र ठरणारे मुकणार आहेत. या भरतीत विद्यापीठाने मराठा आरक्षणाचा अध्यादेश अमलात आणावा, अशी मागणी मराठा आरक्षण संघर्ष समितीचे जिल्हा अध्यक्ष राजू सावंत यांनी पत्रकाद्वारे केली आहे. राज्यातील जिल्ह्याच्या ठिकाणाहून मराठा समाजाला प्रत्यक्ष दाखले मिळत नाही, तोपर्यंत शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेवेळी देखील केवळ प्रवेश द्यावेत. आरक्षणासंबंधीचे दाखले व आरक्षणाच्या अनुषंगाने मिळणारी सवलत यासाठी मराठा समाजातील उपेक्षित, गरजू व हुशार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखला मिळेपर्यंत वेळेची सवलत द्यावी, अशी मागणी त्यांनी या पत्रकातून केली आहे. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, भरतीसाठी प्रसिध्द झालेली ही जाहिरात म्हणजे पहिला टप्पा आहे. त्यामुळे विद्यापीठाने मराठा आरक्षणाचा समावेश करण्यासाठी पुन्हा जाहिरात प्रसिद्ध करावी. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष हिंदुराव हुजरे-पाटील म्हणाले, मराठा समाजातील पात्र उमेदवारांना संधी देण्याबाबत विद्यापीठाने पुनर्विचार करावा.