बेळगावात आज मराठा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2017 23:29 IST2017-02-15T23:29:51+5:302017-02-15T23:29:51+5:30

कोल्हापूर, कोकण, गोव्यातील बांधव सहभागी होणार

Maratha Morcha today in Belgaum | बेळगावात आज मराठा मोर्चा

बेळगावात आज मराठा मोर्चा

बेळगाव : सीमाप्रश्न सुटावा, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह विविध मागण्यांसाठी बेळगाव येथे आज, गुरुवारी मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन केले असून सकाळी दहा वाजता शहरातील छत्रपती शिवाजी उद्यानातून मोर्चाला सुरुवात होईल. सारे बेळगाववासिय झाडून मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचे संयोजकांनी सांगितले. गुरुवारी शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत.
या मोर्चामध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, मिरज, चिकोडी, निपाणी, अथणी, चंदगड, आजरा, गडहिंग्लज, कोकण, गोवा आणि इतर अनेक भागातून मराठीबांधव सहभागी होणार आहेत. पोलिसआयुक्त टी. जी. कृष्णभट्ट यांनी गुरुवारी सकाळी ६ ते मध्यरात्री १२ पर्यंत शहर आणि परिसरात मद्य विक्रीवर निर्बंध घातले आहेत. गुरुवार आजवरच्या इतिहासातील एक सर्वांत मोठ्या क्रांतीचे साक्षीदार ठरणार आहे. लाखो नागरिकांच्या उपस्थितीत विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. १६ फेब्रुवारीला सकल मराठा समाजाच्यावतीने काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मोर्चा पोलिस प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर आता मोर्चाचा मार्ग कसा असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मोर्चा संयोजक राजेंद्र मुतगेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मोर्चाची सुरुवात शिवाजी उद्यानातून होऊन सांगता धमर्वीर संभाजी चौकात होऊ शकते.
संयोजकांनी ठरविलेला मार्ग
शिवाजी उद्यान, कपिलेश्वर रोड, रेल्वे उड्डाण पूल, हेमू कलानी चौक, टिळक चौक, बसवन गल्ली, मारुती मंदिर, हुतात्मा चौक, संयुक्त महाराष्ट्र चौक, समादेवी गल्ली, राजेंद्र प्रसाद चौक ते धमर्वीर संभाजी चौक.

Web Title: Maratha Morcha today in Belgaum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.