रस्ता कामात अनेक नियम, अटी पायदळी
By Admin | Updated: December 7, 2014 00:58 IST2014-12-07T00:28:44+5:302014-12-07T00:58:14+5:30
कोल्हापूर गगनबावडा रस्ता : ठेकेदाराची ५ ते १० टक्के बिलाची रक्कम राखीव ठेवणे गरजेचे

रस्ता कामात अनेक नियम, अटी पायदळी
प्रकाश पाटील / कोपार्डे
रस्ता दुरुस्ती अथवा मजबूतीकरण व डांबरीकरणाच्या कामाचा दर्जा टिकविण्यासाठी शासनाने अनेक नियम व अटी केल्या. मात्र, या नियम व अटीतून शिथिलता मिळावी म्हणून ठेकेदार, तर कमिशन मिळावे म्हणून संबंधित यंत्रणा पैशासाठी लाचार होऊन त्या पायदळी तुडवित असल्याचे चित्र पाहायला मिळते.
वास्तविक कोल्हापूर-गगनबावडा रस्त्याची कामे अनेकवेळा झाली. रस्ता सर्व तांत्रिक बाबी तपासून अंदाजे किती खर्च अपेक्षित आहे, रस्त्यांच्या लांबीसाठी, रुंदीकरण बजेट मंजूर केले जाते. तांत्रिक तंज्ज्ञांची निश्चितच जबाबदारी असणार आहेत. अभियंता व उपअभियंता त्याचे बजेट ठरवितात. तरीही अपुरा निधीचे कारण ठेवून निकृष्ट कामाला पाठबळच दिले जाते.
कामाचा दर्जा तपसाणीसाठी एक मुकादम असूनही तो जागेवरच नसतो.
रस्त्याचे काम, देखभाल दुरुस्ती व नालेसफाई ही त्या ठेकेदाराकडूनच करून घ्यायची असते. यासाठी त्याच्या कामातील बजेटमधील देय रकमेपैकी ५ ते १० टक्के रक्कम पाच वर्षांसाठी शासनाकडेच ठेवून घ्यावयाची असते. त्यातून त्या रस्त्याची देखभाल दुरुस्ती करून घ्यावी, हा नियम आहे. मात्र, ठेकेदाराची सर्व रक्कम दिली जाते. मग शासनाला पॅचवर्किंग करावे लागते.