घरफाळा घोटाळ्याच्या अहवालाची अनेकांना धडकी
By Admin | Updated: May 5, 2015 01:03 IST2015-05-05T01:03:07+5:302015-05-05T01:03:07+5:30
‘एचसीएल’ आज देणार अहवाल : संबंधितांवर कडक कारवाई करण्याची आयुक्तांची सूचना

घरफाळा घोटाळ्याच्या अहवालाची अनेकांना धडकी
कोल्हापूर : घरफाळा विभागातील घोटाळ्यांचे प्रकार पुढे आल्यानंतर आयुक्त पी. शिवशंकर यांनी या विभागासह ‘एचसीएल’ या संगणक ठेकेदारकडून मागविलेला अहवाल आज, मंगळवारी मिळणार आहे. त्याचा अभ्यास करून संबंधितांवर कडक कारवाईची प्रक्रिया सुरू करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. आयुक्तांनी घरफाळ्याची ‘फाईल’ पुन्हा खुली करण्याचा निर्णय घेतल्याने भानगडी बाहेर येण्याच्या धास्तीने अनेकजण उन्हाळ्यात गारठले आहेत.
बागल चौकातील एका मिळकतधारकास परस्पर आठ लाख रुपयांची सूट देण्याचा प्रकार पुढे आला. त्यानंतर घरफाळा विभागातील ढपल्याची मालिकाच उघड झाली. गेली पाच वर्षे विभागाचे लेखापरीक्षण न झाल्याने अनेक कर्मचाऱ्यांनी वाहत्या गंगेत हात धुऊन घेतले. त्यातूनच कच्च्या पावतीच्या आधारे लाखो रुपयांचा कर परस्पर जमा करून लाखो रुपयांचा गंडा महापालिकेला घातल्याचा धक्कादायक प्रकारही पुढे आला. हा प्रकार उघड होऊन वर्ष उलटले तरी घरफाळा विभागातील वरिष्ठांनी संबंधितांस नोटीस बजावण्याखेरीज काहीच केले नाही. घरफाळ्यातील घोटाळा म्हणजे संगणकीय चूक असल्याचे सांगत, सर्व प्रकार ‘एचसीएल’वर ढकल्याचा प्रकार सुरू आहे.
या सर्व प्रकाराची गंभीर दखल आयुक्तांनी घेतली आहे. कच्च्या पावतीद्वारे केलेल्या घोटाळ्याचा अहवाल मंगळवारी आयुक्तांना सादर केला जाणार आहे. त्याआधारे आयुक्त पी. शिवशंकर यांनी कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.