उपनगरातील खासगी सावकारीमुळे अनेकजण कंगाल
By Admin | Updated: May 25, 2015 00:37 IST2015-05-24T22:26:12+5:302015-05-25T00:37:01+5:30
पोलिसांचे दुर्लक्ष : बोलीभिशी, मलबारी भिशी, बचत गटाकडून महिला सावकारी तेजीत; २0 टक्के व्याज

उपनगरातील खासगी सावकारीमुळे अनेकजण कंगाल
अमर पाटील -कळंबा -शहरालगतच्या दक्षिणेस असणाऱ्या साळोखेनगर, सुर्वेनगर, तपोवन, संभाजीनगर, साने गुरुजी वसाहत, राजलक्ष्मीनगर, कळंबा शासकीय कारागृह या उपनगरांत मध्यमवर्गीय वसाहती व झोपडपट्ट्यांचे, कष्टकरी वर्गाचे प्राबल्य आहे. त्यातील आर्थिक अडचणींचे सावज हेरून पिळवणूक करणारी खासगी सावकारांची टोळी फोफावली आहे. त्यांच्या व्याजामुळे अनेकजण कंगाल झाले आहेत.संभाजीनगर झोपडपट्टी, क्रशर चौक, वाल्मीकीनगर, बी. डी. कॉलनी, तामजाई कॉलनी, गंधर्वनगरी, राजलक्ष्मीनगर, कात्यायनी कॉम्प्लेक्स, नृसिंह कॉलनी या उपनगरांतील कॉलन्यांत तर बेकायदेशीर सावकारांनी धुमाकूळ घातलाय, तर कळंबा, साळोखेनगरात बोलीभिशी बोकाळली आहे.उपनगरांत मध्यमवर्गीयांनी विश्वासाने गुंतवणूक केलेल्या ‘तपोवन’, ‘राजीव’, अन्य पतसंस्था, बऱ्याच सहकारी बँका बुडीत निघाल्याने आर्थिक कंबरडेच मोडले व ते सावकारांचे आपसूक सावज बनले. ‘शेठजी’, ‘मामा’, ‘सावकार’, ‘नाना’ या टोपण नावधारक बेकायदेशीर सावकारांनी अत्याचाराचा कहर केला आहे.
दुर्मीळ सरकारी नोकरी, खासगी नोकरीतील तुटपुंजा पगार, मग लग्न, शिक्षण, आजारपण, दैनंदिन गरजा भागविण्यात अडचणी, राष्ट्रीय बँकांची नियमावली अशी की कर्ज मिळणे दुरापास्त, त्यामुळे या सावकारांना सुगीचे दिवस आले आहेत.
पोलिसांचा ससेमिरा मागे नको म्हणून बऱ्याच जणांनी सहकार खात्यात नोंदणी करून या सावकारीचे अधिकृत बारसे करून घेतले आहे. त्यांना विनातारण कर्जासाठी वार्षिक १५ टक्के, तर तारण कर्जासाठी वार्षिक १२ टक्के व्याज घेणे बंधनकारक; पण आता हाच दर महिन्यावर आणून दरमहा २० ते २५ टक्के सक्तीने व्याजआकारणी केली जाते.
पैशाच्या वसुलीसाठी घरदार, सोने, गाडी, जमिनी जबरदस्तीने लिहून घेतल्या जातात. रात्री-अपरात्री महिलांना धमकावणे, शिव्या देणे, वाईट नजरेने पाहणे, छेडछाडीपर्यंत यांची मजल गेली आहे. बेकायदेशीर सावकारी पाशात कित्येक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. जाचास कंटाळून आत्महत्येचे प्रयत्न, घरदारे विकून उपरेही बरेच झाले आहेत.
हे सारे व्यवहार तोंडी; पण कोटींच्या घरात आहेत. या अनधिकृत सावकारांच्या मुसक्या वेळीच आवळणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
बचत गटांआडून महिला सावकारी फॉर्मात
काही बचत गटांचे कार्य कौतुकास्पद आहे. उपनगरांतील बऱ्याच महिला बचत गटांच्या प्रमुखांची सावकारी, दादागिरी तेजीत आहे. जे शोधणे आव्हानात्मक आहे़
उपनगरांत स्वतंत्र पोलीस ठाणे गरजेचे
सर्वच स्तरांतील गुन्हेगारीने उपनगरे अशांत बनली आहेत. सामान्य नागरिक प्रचंड दहशतीखाली वावरतोय. उपनगरांत पोलीस ठाणे झाल्याखेरीज गुन्हेगारीवर अंकुश अशक्य; पण मुहूर्त लागणार कधी?
पोलिसांचे सोयीस्कर दुर्लक्ष
एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न व त्याचे राहणीमान यांची सांगड घातली की, गुन्हेगारी विश्वाचे कोडे उलगडते. पोलिसांसोबत असणारे हे बेकायदेशीर सावकार सामान्य माणसांना माहीत असून, पुराव्याविना अनभिज्ञ, सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते.
बेकायदेशीर खासगी सावकारीचे उपनगरांतील विश्व भयावह असून, समाजस्वास्थ्य बिघडत चालल्याचे प्रतीक आहे. पोलिसांनी हे चित्र बदलणे काळाची गरज आहे.
- अजय सावेकर, माजी सरपंच, कळंबा