जत पूर्वच्या ४२ गावांना पाण्यासाठी ३२ कोटी
By Admin | Updated: July 9, 2015 01:00 IST2015-07-09T01:00:40+5:302015-07-09T01:00:40+5:30
मुंबईतील बैठकीत आश्वासन : ‘म्हैसाळ’च्या पाण्याने तलाव भरणार

जत पूर्वच्या ४२ गावांना पाण्यासाठी ३२ कोटी
आंदोलन मागे : जगताप
सांगली : जत तालुक्यातील पूर्व भागातील ४२ गावांना तलावाद्वारे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी देण्यासाठी राज्य शासनाने ३२ कोटींचा निधी देण्याचे निश्चित केले आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी मुंबईतील बैठकीत पाणी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांना आश्वासन दिल्यामुळे त्यांनी आंदोलन मागे घेतले आहे, अशी माहिती जतचे आमदार विलासराव जगताप यांनी दिली.
म्हैसाळ योजनेमध्ये समावेश करण्यासाठी जत तालुक्यातील ४२ गावांतील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार (दि. ६) पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला होता. या पार्श्वभूमीवर मुंबईत जलसंपदामंत्री गिरीश
महाजन यांच्या निवासस्थानी बुधवारी सायंकाळी बैठक झाली.
या बैठकीस खासदार संजय पाटील, आ. जगताप, आमदार सुधीर गाडगीळ, जलसंपदा विभागाचे उपसचिव उपासे, ‘कृष्णा खोरे’चे कार्यकारी संचालक गोटे, मुख्य सचिव शहा, पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार, संजय तेली, रामण्णा जिवाणावर, आदी उपस्थित होते.
४२ गावांतील पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. पिके वाळू लागली असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. पाणीप्रश्नावर येथील शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. यामुळे या गावांचा म्हैसाळ योजनेत समावेश करावा, अशी मागणी खासदार पाटील व जगताप यांनी केली.
यावेळी गिरीश महाजन म्हणाले की, तातडीने गावांचा म्हैसाळ योजनेत समावेश करता येणार नाही; पण जत पूर्व भागातील ४२ गावांना म्हैसाळ योजनेचे पाणी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्यासाठी संख, दोड्डनालासह जत तालुक्यातील २२ पाझर तलाव, कोल्हापूर पध्दतीचे बंधारे म्हैसाळ योजनेच्या पाण्याने भरून दिले जातील. या पाण्याचा जत पूर्व भागातील ४२ गावांना लाभ देण्यात येईल. येथील कामे पूर्ण करण्यासाठी शासनाकडून २०१५-१६ या वर्षामध्ये ३२ कोटींचा निधी देण्यात येईल. या निधीतून अधिकाऱ्यांनी मुख्य कालव्यांची कामे शंभर टक्के पूर्ण करावीत, अशी सूचनाही अधिकाऱ्यांना दिली आहे.
या निधीशिवाय, चार जेसीबी यंत्रे (डिझेलसह) शासन देणार आहे. या जेसीबींच्या माध्यमातून जत तालुक्यातील म्हैसाळ योजनेच्या पाचव्या आणि सहाव्या टप्प्यातील कामे तातडीने पूर्ण करण्यात येतील. तसेच म्हैसाळ योजनेतून जत तालुक्यासाठी ४.७९ टीएमसी पाणी देण्याचे निश्चित केले आहे. (प्रतिनिधी)
अंकले, खलाटीच्या पंप हाऊसचे काम नोव्हेंबरमध्ये
जत तालुक्यातील अंकले आणि खलाटी येथे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पंप हाऊस तयार करून पूर्व भागातील गावांना पाणी देण्यात येणार आहे. या महत्त्वपूर्ण पंप हाऊसच्या कामांना बुधवारच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. येथील काम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे आश्वासन गिरीश महाजन यांनी दिल्याचे जगताप यांनी सांगितले.