मैनुद्दीनची पोलिसांना पार्टी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2016 23:56 IST2016-03-18T22:21:26+5:302016-03-18T23:56:51+5:30
एकाला बुलेट : दुसऱ्या पोलिसाला फ्लॅटचे आमिष

मैनुद्दीनची पोलिसांना पार्टी ?
सांगली : वारणानगर (जि. कोल्हापूर) येथे तीन कोटीच्या रकमेवर ‘डल्ला’ मारणाऱ्या जाखले (ता. पन्हाळा) येथील मैनुद्दीन ऊर्फ मोहिद्दीन मुल्ला याने गेल्या आठवड्यात मिरजेतील गांधी चौकी व शहर पोलीस ठाण्यातील काही पोलिसांना ओली पार्टी दिल्याची चर्चा रंगली आहे. पार्टीत त्याने एका पोलिसाला बुलेट खरेदी करण्याचे वचन देऊन ते पूर्णही केले; तसेच आणखी एका पोलिसाला त्याने फ्लॅट खरेदी करुन देण्याचे वचन दिले होते. पण या पार्टीनंतर दुसऱ्यादिवशी त्याच्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषणची झडप पडली. पार्टीची चर्चा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर गेली आहे. पण हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरु आहे.
वारणानगर येथे वारणा शिक्षण मंडळाच्या शिक्षक कॉलनीतून मुल्लाने सव्वातीन कोटीची रक्कम लंपास केली होती. ही रक्कम कोल्हापूर येथील बांधकाम व्यावसायायिक झुंझारराव सरनोबत यांची असल्याचे स्पष्ट झाले होते. मुल्लाने प्रेमविवाह केला आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षापासून तो पत्नीसह त्याची मिरजेतील बेथेलहेमनगरमधील मेहुणी रेखा भोरे हिच्याकडे राहत होता. ८ मार्चला त्याने रक्कम चोरली. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसात त्याने पोलिसांना मिरजेतील एका हॉटेलमध्ये ओली पार्टी दिल्याची चर्चा रंगली आहे. या पार्टीला मिरजेतील गांधी चौकी व शहर पोलीस ठाण्यातील ‘तोडपाणी’ करण्यात माहीर असलेले काही पोलीस गेले होते. मुल्लाचे या पोलिसांसोबत चांगले संबंध आहेत. पार्टीमध्ये एका पोलिसाने बुलेटची, तर दुसऱ्या पोलिसाने फ्लॅट खरेदी करुन देण्याची मागणी केल्याचे समजते. त्यानुसार मुल्लाने दुसऱ्याचदिवशी गांधी चौकीतील पोलिसाच्या नावावर बुलेट खरेदी केली. ही बाब यापूर्वीही स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या रेकॉर्डवर आली आहे.
मुल्लाने चोरलेले मोठे ‘घबाड’ व पोलिसांना दिलेल्या पार्टीची चर्चा स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या खबऱ्यापर्यंत गेली. या खबऱ्याने ही चर्चा गुन्हे अन्वेषणच्या पथकाला सांगितली.
पथकाने मुल्लावर ‘करडी’ नजर ठेवून त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याच्याकडे झडतीत सव्वालाख रुपये सापडले. पण त्यानंतर तो राहत असलेल्या बेथेलहेमनगरमध्ये भाड्याच्या खोलीत सुमारे तीन कोटी सात लाख ६३ हजार पाचशे रुपये सापडले होते. याशिवाय दोन नवीन बुलेट सापडल्या होत्या. एक बुलेट त्याने पोलिसाच्या नावावर घेतल्याची माहिती पुढे आली. (प्रतिनिधी)
पार्टी कशासाठी?: पोलिसांचा संबंध काय?
मैनुद्दीन मुल्ला याचे मिरजेतील पोलिसांबरोबर एवढे जिव्हाळ्याचे संबंध कसे? त्याने पार्टी देऊन बुलेट खरेदी व फ्लॅट देण्याचे आमिष का दाखविले? अशी चर्चा सुरु आहे. चोरीचा गुन्हा त्याने या पोलिसांसमोर कबूल केला होता काय? कबूल केला असेल मिरजेतील पोलीस गप्प का बसले? या मुद्यांचीही चर्चा आहे. बुलेट खरेदी प्रकरण रेकॉर्डवर येऊनही वरिष्ठ अधिकारी गप्प बसले आहेत. या प्रकरणाची साधी चौकशी करण्याचे आदेशही दिले नाहीत. स्थानिक पातळीवर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी संबंधित बुलेट खरेदी करणाऱ्या पोलिसाची चौकशी केली. पण त्याने, माझा काही संबंध नाही, असे सांगितले असल्याचे समजते.
तीन दिवसांची पोलिस कोठडी
पन्हाळा : वारणानगर येथे वारणा शिक्षण मंडळाच्या शिक्षक कॉलनीतील चोरीप्रकरणी मुख्य संशयित मैनुद्दिन मुल्ला याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पन्हाळा न्यायालयात शुक्रवारी हजर केले. न्या. भूषण ठाकूर यांनी मुल्ला याला तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
यावेळी सरकारी वकील अमोल कांबळे यांनी मैनुद्दिन मुल्ला याच्याकडून नेमकी रक्कम किती, चोरी करताना वापरलेले हत्यार, गाडी जप्त करणे व अन्य तपास होण्यासाठी संशयितास सात दिवसांची पोलिस कोठडी मागितली. तथापि वकील पी. ए. सुतार यांनी रक्कम जप्त झाल्यानंतर झुंंजार सरनोबत यांनी आपली रक्कम मैनुद्दिन याने चोरली असल्याची फिर्याद दिली.
२०१४ मध्ये मुंबईत सात कोटींची चोरी झाली, त्यातही तो संशयित आहे, असे समजते, रक्कम सापडल्यानंतर सर्वचजण ही रक्कम माझी म्हणून आले आहेत, हे चुकीचे आहे, असा युक्तिवाद केला. त्यानंतर न्या. भूषण ठाकूर यांनी मुल्ला याला सोमवार (दि. २१) पर्यंत पोलिस कोठडी दिली.स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते, विकास जाधव, प्रकाश संकपाळ, संजय हुंबे यांनी मैनुद्दिन मुल्ला यास कोर्टासमोर हजर केले. आरोपीस भेटण्यासाठी त्याची पत्नी काही औषध घेऊन आली होती.
पण ही औषधे मुदत संपलेली असल्याने पोलिसांनी मुल्लाची भेट घेण्यास नकार दिला. (प्रतिनिधी)
फोटो 18 पन्हाळा- मैनुद्दीन मुल्ला