सात कोटींच्या चोरीतही मैनुद्दीन संशयित
By Admin | Updated: March 18, 2016 00:25 IST2016-03-18T00:25:07+5:302016-03-18T00:25:55+5:30
प्रकरण २०१४ मधील : मुंबई पोलिसांचे पथक सांगली, कोल्हापुरात

सात कोटींच्या चोरीतही मैनुद्दीन संशयित
सांगली : मुंबईत २०१४ मध्ये झालेल्या सात कोटींच्या चोरीप्रकरणी मैनुद्दीन मुल्ला संशयित असून, त्याचा ताबा घेण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक गुरुवारी सांगलीत दाखल झाले होते.
मुंबईत सांताक्रुझ पोलिस ठाण्याच्या हद्दीत २०१४ मध्ये एका दुकानात सुमारे सात कोटींची चोरी झाली आहे. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत; पण एकालाही अटक करण्यात यश आले नाही. यातील एका संशयिताचे छायाचित्र मुल्लाशी मिळते-जुळते आहे. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक गुरुवारी सांगलीत दाखल झाले होते. न्यायालयाकडे त्यांनी ताबा देण्याची विनंती केली; पण कोडोली पोलिसांचा मुल्लाचा ताबा मिळावा अशी मागणी करणारा अर्ज आधी आला होता. त्यामुळे न्यायालयाने मुल्लास कोडोली पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले. त्यानुसार कोडोली पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली. हा तपास पूर्ण झाल्यानंतर मुंबई पोलिस न्यायालयाच्या आदेशाने मुल्लाचा ताबा घेणार आहेत. (प्रतिनिधी)
चावी ‘जी.डीं.’च्या मुलाकडे
ज्या खोलीतील तिजोरीतून रोकडचे घबाड बाहेर पडले. त्या खोलीच्या कुलुपाची चावी शिक्षण संस्थेचे सचिव जी. डी. पाटील यांचे बांधकाम व्यावसायिक असलेले चिरंजीव आशुतोष पाटील यांच्याकडे होती. तो यापूर्वी आॅस्ट्रेलियात वास्तव्यास होता, तो आता येथे आला आहे.
सांगली पोलिसांनी जप्त केलेले सुमारे तीन कोटी सात लाख व कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यातील एक कोटी ३१ लाखांची रोकड बेहिशेबी आहे का, याची माहिती घेण्यासाठी प्राप्तिकर खात्याकडे हस्तांतर करण्यात येणार आहे.
- सूरज गुरव, पोलिस उपअधीक्षक, शाहूवाडी.