मानसिंगराव-संजयकाका आमने-सामने
By Admin | Updated: June 1, 2015 00:21 IST2015-05-31T23:25:55+5:302015-06-01T00:21:04+5:30
जिल्हा बँक : राज्य सहकारी बँकेवरील प्रतिनिधीत्वासाठी सत्ताधारी पॅनेलमध्ये पुन्हा छुपा संघर्ष

मानसिंगराव-संजयकाका आमने-सामने
सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीतून सुरू झालेली सत्ताधारी पॅनेलमधील संघर्षाची कहाणी अजूनही सुरूच आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत राज्य बँकेसाठी प्रतिनिधी नियुक्त करण्याचा ठराव होणार असल्याने, त्यासाठीही आता चुरस निर्माण झाली आहे. या पदासाठी खासदार संजय पाटील आणि मानसिंगराव नाईक यांची नावे चर्चेत असून, रविवारी दिवसभर दोन्ही गटाकडून एकमेकांचा पत्ता कट करण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावण्याचे काम सुरू होते.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत सध्या आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी सहकारी पॅनेलची सत्ता आहे. सत्ता आली असली तरी, अंतर्गत संघर्ष व रुसवाफुगवीच्या कहाण्याही आता बाहेर पडत आहेत. अध्यक्षपदाच्या निवडीवेळीच या गोष्टी समोर आल्या होत्या. अध्यक्षपदासाठी शिराळ्याचे मानसिंगराव नाईक आणि वाळव्याचे दिलीपतात्या पाटील यांच्यात चुरस होती. दुष्काळी फोरमच्या नेत्यांनी मानसिंगरावांच्या नावाला विरोध दर्शविला होता. मानसिंगरावांचे आणि पतंगरावांचे नातेसंबंध पुढे करून राजकीय खेळी करण्यात आली. कदम गटाला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष बळ दिले जाऊ नये, अशी विनंती करून मानसिंगरावांचा पत्ता अध्यक्षपदाच्या शर्यतीतून कट करण्यात आला होता. निवडीनंतरही नाराजी कायम राहिली. त्यावेळी मानसिंगरावांनी लगेचच सभागृह सोडले होते.
अध्यक्षपदापासून पेटलेले अंतर्गत राजकारण आता राज्य बँकेच्या प्रतिनिधीत्वापर्यंत कायम राहणार आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची पहिली सभा सोमवारी १ जून रोजी होत आहे. या बैठकीत राज्य बँकेवरील प्रतिनिधी नियुक्त करणे, संचालकांची कार्यकारी समिती निवड, मोठ्या संस्थांसाठी प्रतिनिधी नियुक्ती असे विषय घेण्यात आले आहेत. यामध्ये सर्वात चर्चेचा विषय राज्य बँकेवरील प्रतिनिधीत्वाचा आहे. या पदासाठी मानसिंगराव नाईक आणि संजय पाटील यांची नावे चर्चेत आहेत. मानसिंगरावांचा पत्ता कट करण्यासाठी पुन्हा दुष्काळी फोरमच्या नेत्यांनी ‘फिल्डिंग’ लावली आहे. दुसरीकडे मानसिंगरावांच्या समर्थकांनीही नेत्यांशी चर्चा केली आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांपैकी कोणाला या पदावर संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्य बँकेचे प्रतिनिधीत्व आता प्रतिष्ठेचे बनले आहे. जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांना त्यासाठी लक्ष घालावे लागत आहे. सत्ताधारी गटाचे १५ आणि विरोधी काँग्रेसचे ६ संचालक आहेत.
सत्ताधाऱ्यांच्या संघर्षामध्ये आता विरोधकही आपली पोळी भाजण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे त्यांनी राज्य बँक प्रतिनिधीत्वासह अन्य निवडींबाबत सुरू असलेल्या सत्ताधाऱ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले आहे. (प्रतिनिधी)
मानसिंगरावांची दावेदारी मजबूत
मानसिंगराव नाईक हे अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार होते, मात्र राज्य बँकेच्या प्रतिनिधीत्वाचे कारण पुढे करून त्यांना डावलण्यात आले होते. आता या प्रतिनिधीत्वापासून त्यांना डावलण्याचे कोणतेही कारण सत्ताधारी गटाला देता येणार नाही. त्यामुळे त्यांची दावेदारी मजबूत मानली जात आहे. राजकीय घडामोडींना रविवारी रात्रीपासून वेग आल्याने, निवड कोणाची होणार याबाबत आता संचालकांसह जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.
दावेदारीमागे दडलंय काय..?
तासगाव कारखान्याचा ताबा सध्या राज्य बँकेकडे आहे. या वादात राज्य बँकेची भूमिकाही महत्त्वाची मानली जाते. अशावेळी राज्य बँकेचे प्रतिनिधीत्व मिळवून काही गोष्टींचा मार्ग मोकळा करता येणे संजयकाकांसाठी शक्य आहे. त्यामुळे या पदावरील दावेदारीमागे तासगाव कारखाना हे मुख्य कारण असू शकते. संजयकाकांच्या नावासाठी दुष्काळी फोरमचे नेते ताकद लावत आहेत. भाजपला बँकेत उपाध्यक्ष पदाची संधी मिळाली आहे. राज्य बँकेचे प्रतिनिधीत्व मिळाले, तर त्यांचा कोटा पूर्ण होऊ शकतो. अन्य कोणत्याही पदाची अपेक्षा करण्याचे कारण त्यांच्याकडे राहणार नाही.