बिद्रेवाडीच्या मंगेश गुरवला मदतीची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:23 IST2021-03-26T04:23:54+5:302021-03-26T04:23:54+5:30
रवींद्र हिडदुगी। नेसरी : एक वर्षापूर्वी गडहिंग्लजनजीक झालेल्या मोटारसायकल अपघातात गंभीर दुखापत होवून अंथरुणावर असलेल्या मंगेश लक्ष्मण ...

बिद्रेवाडीच्या मंगेश गुरवला मदतीची गरज
रवींद्र हिडदुगी। नेसरी : एक वर्षापूर्वी गडहिंग्लजनजीक झालेल्या मोटारसायकल अपघातात गंभीर दुखापत होवून अंथरुणावर असलेल्या मंगेश लक्ष्मण गुरव या तरुणाला मदतीची गरज आहे. मंगेश हा बिद्रेवाडी (ता. गडहिंग्लज) या छोट्याशी खेड्यातला असून, घर चालविण्यासाठी आधुनिक पद्धतीच्या अंतर्गत घर सजावटीचे काम अर्थात वॉलपेपरचे काम गेले सात-आठ वर्षे करीत आहे.
मात्र या अपघातातील गंभीर दुखापतीने त्याला चालता येत नाही. गेले वर्षभर तो अंथरुणाला खिळून आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबाची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटलेली आहे.
कुटुंबाची जबाबदारी असलेल्या मंगेशच्या अशा बिकट स्थितीमुळे संपूर्ण कुटुंब सध्या काळजीत आहे. जगण्याची प्रखर इच्छाशक्ती व आत्मविश्वास असलेल्या मंगेशला आता आर्थिक मदतीची गरज आहे.
सुखा-समाधानाने चालेल्या सुखी संसारात अपघाताने अडचणी निर्माण झाल्या आहेत. अपघातात मणक्याचा ९० टक्के भाग निकामी झाला आहे. मंगेशला यातून बाहेर काढण्यासाठी शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे. शस्त्रक्रियेसाठी सुमारे आठ लाख खर्च अपेक्षित आहे. मंगेशच्या घरची परिस्थिती बेताची आहे. वयस्कर आई-वडील, मोलमजुरी करून, तर पत्नी शिलाईचे काम करून घरची गुजराण करत आहेत.
जमीन बेताची, डोंगराळ भागात असून त्यातून मिळणारे उत्पन्नही अत्यल्प आहे. गुरव कुटुंबाने एक वर्षात मंगेशचा दवाखाना, औषधोपचारावर बराच खर्च केला आहे.
व्हिलचेअर खुर्ची भाड्याने आणली आहे. औषधे व दैनंदिन खर्चाबरोबरच आई-वडील, पत्नी, दोन मुले यांचा घरखर्च गुरव कुटुंबीयांच्या आवाक्याबाहेरचा आहे. मंगेशला इतरांसारखे जीवन अनुभवण्यासाठी व कुटुंबाची गाडी रुळावर आणण्यासठी दानशूर व्यक्ती, संस्था यांनी पुढे येण्याची गरज आहे.
------------------------
* अपघातात माझ्या मणक्याचा ९० टक्के भाग निकामी झाला आहे. एक वर्ष मी अंथरुणावर खिळून आहे. घरच्यांनी माझ्या उपचारासाठी बराच पैसा खर्च केला आहे. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे. पण, घरची परिस्थिती बेताची असून समाजातील देवदूतानी आर्थिक मदत करून मला पुन्हा सर्वसामान्य जीवन जगण्यासाठी ऊर्जा द्यावी.
- मंगेश लक्ष्मण गुरव
--------------------
* फोटो ओळी : वर्षभरापूर्वी अपघातात गंभीर दुखापत झालेला मंगेश गुरव. शेजारी पत्नी व दोन मुले.
क्रमांक : २५०३२०२१-गड-१०