मंडलिक, सा.रे., घाटगे, गायकवाड कुटुंबीयांचे पवारांकडून सांत्वन
By Admin | Updated: July 8, 2015 00:11 IST2015-07-08T00:11:48+5:302015-07-08T00:11:48+5:30
कोल्हापूर दौरा : ‘मंडलिक’ कारखान्याच्या दराचे पवारांना कोडे

मंडलिक, सा.रे., घाटगे, गायकवाड कुटुंबीयांचे पवारांकडून सांत्वन
कोल्हापूर : साखरउद्योग अडचणीत असताना उच्चांकी एफआरपी २६७५ रुपये मंडलिक साखर कारखान्याने दिली कशी? असे कोडे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पडले. साखर कशी विकली, कसे पैसे उभे केले, अशी विचारणाही पवार यांनी कारखान्याचे अध्यक्ष संजय मंडलिक यांना केली. दिवंगत नेते सदाशिवराव मंडलिक यांच्या रुईकर कॉलनी येथील घरी जाऊन पवार यांनी मंगळवारी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
सदाशिवराव सडपातळ असताना तब्येत अचानक कशी बिघडली, अशी विचारपूस करीत कारखाना व जिल्हा बॅँक बघता काय? कारखाना कसा चालला आहे, अशी विचारणा पवार यांनी संजय मंडलिक यांच्याकडे केली.
कारखाना चांगला चालला आहे. आतापर्यंत २६७५ रुपये प्रतिटन बहुतांश एफआरपी शेतकऱ्यांना दिल्याचे मंडलिक यांनी सांगितले. यावर आश्चर्य व्यक्त करीत पैसे कोठून आणले, साखर विकली का? अशी विचारणा पवार यांनी केली. पॅकेजवर अवलंबून राहू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.
आमदार हसन मुश्रीफ, के. पी. पाटील, निवेदिता माने, ए. वाय. पाटील, भैया माने, भूषण पाटील, विलास गाताडे, नरसिंग पाटील, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, बंडोपंत चौगुले, वीरेंद्र मंडलिक, वैशाली मंडलिक, आदी उपस्थित होते.
दरम्यान, पवार यांनी माजी खासदार उदयसिंगराव गायकवाड यांच्या ताराबाई पार्क येथील निवासस्थानी भेट देऊन मानसिंगराव गायकवाड यांचे सांत्वन केले. यावेळी शैलेजादेवी गायकवाड, महादेव पाटील, विजय बोरगे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सा. रे. पाटील यांचे कार्य आदर्शवत
जयसिंगपूर : आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत शेतकरी, कामगार व उपेक्षित घटकांना न्याय मिळावा, अशीच कार्यपद्धत सा. रे. पाटील यांची होती. सहकारक्षेत्रात मोठे योगदान देणारी व्यक्ती म्हणून त्यांचे आदर्शवत कार्य राष्ट्रीय पातळीवर होते. त्यामुळे सहकार चळवळीत वैभव प्राप्त झाले, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. पवार यांनी मंगळवारी दुपारी सा. रे. यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांनी श्रीमती कृष्णाबाई पाटील, पुत्र गणपतराव पाटील व बंधू अण्णासाहेब पाटील यांच्याशी संवाद साधला व सा. रे. पाटील यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
राजेंना कशाचा त्रास होता : पवार
कोल्हापूर : राजेंचा नियमित व्यायाम असतानादेखील त्यांना कशाचा त्रास झाला, अशी विचारणा अध्यक्ष पवार यांनी घाटगे यांचे चिरंजीव व शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह यांच्याकडे केली. शरद पवार यांनी मंगळवारी दिवंगत माजी आमदार विक्रमसिंह घाटगे यांच्या कुटुंबीयांचे त्यांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वन केले. यावेळी त्यांनी किती एफआरपी दिला, असे विचारल्यानंतर समरजितसिंह घाटगे यांनी २३५० रुपये दिल्याचे सांगितले. यावेळी सुहासिनीदेवी घाटगे, नवोदिता घाटगे, वीरेंद्रसिंह घाटगे, आमदार हसन मुश्रीफ, आदी उपस्थित होते.