मनपाचा ‘एक विद्यार्थी, एक रोप’ उपक्रम
By Admin | Updated: July 27, 2015 00:01 IST2015-07-27T00:01:31+5:302015-07-27T00:01:31+5:30
प्राथमिक शिक्षण मंडळ : शाळेचा परिसर होणार हिरवागार

मनपाचा ‘एक विद्यार्थी, एक रोप’ उपक्रम
प्रदीप शिंदे - कोल्हापूर --राज्यातील शाळांमध्ये दरवर्षी राबविल्या जाणाऱ्या वृक्षारोपण मोहिमांची अंमलबजावणी प्रभावीरीत्या व्हावी, शालेय विद्यार्थ्यांमध्ये वने, जैवविविधता, तसेच दुर्मीळ अशा वनसंपदेचे रक्षण व त्यांच्या संवर्धनाबाबत संस्कारक्षम वयातच जाणीव व आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाच्यावतीने यंदापासून ‘एक विद्यार्थी, एक रोप’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. ‘एक विद्यार्थी, एक रोप’ या उपक्रमात फक्त विद्यार्थ्यांना सहभागी करून न घेता सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही यामध्ये सहभागी करून घेतले जाणार आहे. याबाबतचे परिपत्रक लवकरच काढले जाणार असल्याचे प्राथमिक शिक्षण मंडळाचे उपसभापती भरत रसाळे यांनी सांगितले.
या उपक्रमामुळे आता महानगरपालिकेच्या शाळांसह परिसर हिरवागार तर होणारच; पण त्याचसोबत विद्यार्थ्यांत पर्यावरणाची जनजागृती नक्कीच होणार आहे. कऱ्हाड येथील नगरपालिकेच्या शाळेत जाऊन या उपक्रमांची माहितीही मंडळाच्यावतीने नुकतीच घेतली आहे.
प्रत्येक विद्यार्थ्यांला एक कुंडी रोपटे दिले जाणार आहे. त्याच्या संगोपनाची जबाबदारी ही विद्यार्थ्यांची असणार आहे. त्यामुळे माझे झाड ही भावना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रूजविण्यास मदत होईल. ही योजना शाळेपुरतीच मर्यादित न ठेवता शहर, गावपातळीवरही याचा प्रसार करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. या उपक्रमासाठी आम्ही सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तींचीही मदत घेणार असल्याचे रसाळे यांनी सांगितले.
प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेत एका कुंडीसह रोप दत्तक म्हणून देण्यात येणार आहे. त्याच्या संगोपनाची जबाबदारी त्या विद्यार्थ्यांवर असेल. झाडे लावण्यासाठी दिल्यानंतर विद्यार्थी झाडांचे संगोपन चांगल्याप्रकारे करतात की नाही, यांची पाहणी शिक्षकांमार्फत केली जाणार आहे. त्याची पाहणी व नोंद प्राथमिक शिक्षण मंडळाच्या निरीक्षकांमार्फत दर महिन्याला घेतली जाणार आहे.
- महेश जाधव, सभापती, प्राथमिक शिक्षण मंडळ, मनपा