मनकर्णिका कुंडावरील शौचालय पाडले
By Admin | Updated: June 7, 2016 07:39 IST2016-06-07T07:39:38+5:302016-06-07T07:39:38+5:30
अंबाबाई मंदिर परिसर : भाविकांच्या सोयीसाठी मोबाईल टॉयलेट; आमदारांसह शिवसैनिकांना ताब्यात घेऊन सोडून दिले

मनकर्णिका कुंडावरील शौचालय पाडले
कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या आवारातील मनकर्णिका कुंडावरील शौचालय वारंवार मागणी करूनही महापालिकेने न हटवल्याने अखेर सोमवारी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह शिवसैनिकांनी ते पाडले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे मंदिरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करत आमदारांसह शिवसैनिकांना ताब्यात घेतले व नंतर सोडून दिले. भाविकांची गैरसोय होवू नये म्हणून मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.
अंबाबाई मंदिर परिसरातील महालक्ष्मी उद्यानात पालिकेचे सार्वजनिक शौचालय आहे. मात्र याखाली अंबाबाई मूर्तीच्या स्नानाचे पाणी जाते ते मनकर्णिका कुंड आहे. या कुंडावरील शौचालय हटवावे, अशी मागणी आमदार क्षीरसागर यांनी केली होती. विधानसभा अधिवेशनावेळीही आंदोलन केले होते. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही वारंवार त्याचा पुनरुच्चार करण्यात आला. मात्र जिल्हा प्रशासन व महापालिकेनेही याकडे दुर्लक्ष केले. अखेर सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास आमदार क्षीरसागर यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते मंदिराच्या आवारात आले व त्यांनी शौचालय पाडायला सुरुवात केली. या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला.
ही जागा देवस्थान समिती अस्तित्वात येण्यापूर्वी म्हणजे १९५२ साली महापालिकेकडे वर्ग करण्यात आली. त्यामुळे देवस्थान समिती यात हस्तक्षेप करू शकत नव्हती. अखेर जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख यांनी आमदार क्षीरसागर यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. येथे पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे, देवस्थान समितीच्या सचिव शुभांगी साठे, अभियंता सुदेश देशपांडे, महापालिकेचे कनिष्ठ अभियंता एस. के. पाटील उपस्थित होते. यानंतर आमदार क्षीरसागर यांच्यासह कार्यकर्त्यांना सोडून देण्यात आले. संध्याकाळी उशिरा महापालिकेच्यावतीने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याच्या तक्रारीची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. (प्रतिनिधी)