माणसी दहा किलो धान्य मोफत मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:30 IST2021-04-30T04:30:31+5:302021-04-30T04:30:31+5:30
कोल्हापूर : केंद्र शासनाने दोन महिने व राज्य शासनाने एक महिना रेशनवरील धान्य मोफत देण्याची घोषणा केल्याने नागरिकांना मे ...

माणसी दहा किलो धान्य मोफत मिळणार
कोल्हापूर : केंद्र शासनाने दोन महिने व राज्य शासनाने एक महिना रेशनवरील धान्य मोफत देण्याची घोषणा केल्याने नागरिकांना मे महिन्याचे धान्य माणसी दहा किलोइतके मिळणार आहे. याचा लाभ जिल्ह्यातील २५ लाख ३१ हजार ९७३ नागरिकांना होणार आहे. राज्य शासनाकडील तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ या पाच किलो धान्याचे वितरण शनिवारपासून सुरू होणार आहे. मात्र, केंद्राकडील पाच किलो धान्य मे महिन्याच्या अखेरीस मिळण्याची शक्यता आहे.
देशासह राज्यात देखील कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला असून राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. या काळात गरीब नागरिकांना उपाशीपोटी राहावे लागू नये यासाठी राज्य शासनाने मे महिन्याचे धान्य मोफत देण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर केंद्र शासनानेही मे आणि जून असे दोन महिन्याचे धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्राकडील धान्याचे वितरण मात्र अजून सुरू झालेले नाही. तेथील धान्य कोल्हापुरात येऊन ते रेशन दुकानदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मे महिन्याची २० तारीख उजाडेल असा अंदाज आहे. त्यामुळे त्यांच्याकडील धान्य मिळण्यास उशीर होणार आहे. असे असले तरी केंद्र व राज्य शासनाचे असे दोन्ही मिळून मे महिन्यासाठी प्रत्येक नागरिकाला १० किलो धान्य मोफत मिळणार आहे.
---
लाभार्थी कार्डांची संख्या : ५ लाख ६७ हजार ३२१
लाभार्थी व्यक्ती संख्या : २५ लाख ३१ हजार ९७३
--